शिवसेना एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस कामगारांच्या पाठीशी ठाम, उद्धव ठाकरे यांची ग्वाही

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने 23 एप्रिल रोजी जोरदार आंदोलन केले होते. त्यानंतर व्यवस्थापनाने कामगारांच्या अनेक मागण्या मान्य केलेल्या आहेत. या आंदोलनाची माहिती देण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट घेतली. शिवसेना कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची ग्वाही यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 2004 पासून सुमारे 22 हजार कामगार काम करतात. या कंपनीत अजून मानवी संसाधनची कोणतीही पॉलिसी नाही, एकही कामगार नोकरीत कायम केलेला नाही, कामगारांना सेवाज्येष्ठतेनुसार योग्य पगारवाढ दिली जात नाही, प्रॉपर प्रमोशन पॉलिसी नाही, महिला कर्मचाऱ्यांना रात्री उशिरा सोडतात,  रात्रीच्या डय़ुटीमध्ये एक सुट्टी घेतली की दोन रजा भराव्या लागतात, अनेक कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी दिलेला नाही, अपघाती रजा वेळेवर भरल्या जात नाहीत, रजा असूनदेखील मंजूर केल्या जात नाहीत, युनिफॉर्मसाठी पगारातून पैसे कापतात, व्यवस्थापन मर्जीप्रमाणे कामगारांचे कॉण्ट्रक्ट करते अशा कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्थानीय लोकाधिकार समिती आणि एव्हिएशन कामगार सेनेने 23 एप्रिल रोजी कंपनीच्या व्यवस्थापनावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला होता.

यावेळी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे कार्याध्यक्ष विलास पोतनीस, उपाध्यक्ष उल्हास बिले, चिटणीस बाळासाहेब कांबळे, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस प्रशांत सावंत, सहसरचिटणीस प्रवीण शिंदे, उपाध्यक्ष अमोल कदम, उमेश सानप उपस्थित होते.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे केले कौतुक    

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते- खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत या कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात केलेल्या आंदोलनाची माहिती दिली. व्यवस्थापनाने मोर्चामध्ये अनेक मागण्या मान्य केल्या असून 21 मे रोजी व्यवस्थापनाला पुन्हा भेटून मान्य केलेले कोणते विषय व्यवस्थापनाने सोडवले आहेत याची खात्री करून घेण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे याची माहितीही त्यांना दिली. अनेक अधिकारी जाणूनबुजून कामगारांना त्रास देतात. त्यामुळे आम्ही एक मोठा लढा उभाणार आहोत आणि शिवसेना भवन येथे फिक्स टर्म पंत्राटी कामगारांचा मेळावा लावणार असल्याचेही सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आणि एव्हिएशन कामगार सेनेचे कौतुक केले.