
मराठी भाषेची महती हिंदुस्थानसह जगाला कळावी यासाठी ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस दरवर्षी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने त्या दिवशी मराठीचा जागर केला जातो. यंदाही महासंघाने मराठी भाषा दिनी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन या सोहळ्याला लाभणार आहे. या सोहळ्याला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी शिवसेना आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठीचाटक्का वाढावा यासाठी गेली अनेक दशके कार्यरत असलेल्या लोकाधिकार महासंघाच्या वतीने मराठी भाषा दिवस मोठय़ा जल्लोषात आणि धूमधडाक्यात साजरा केला जातो. त्या सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात आज शिवसेना भवन येथे लोकाधिकार महासंघ आणि संलग्न समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, कार्याध्यक्ष विलास पोतनीस आणि आमदार सुनील शिंदे, सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषा दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा दिवसाचा कार्यक्रम एक आगळावेगळा आणि ऐतिहासिक ठरेल असा प्रयत्न सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन या बैठकीत प्रदीप मयेकर यांनी केले, अशी माहिती महासंघाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.
स्थळ – बिर्ला मातोश्री सभागृह, मरीन लाईन्स
वेळ – सायंकाळी 6 वाजता





























































