
काँग्रेसचे निष्ठावंत पाईक तसेच अभ्यासू नेता अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवारी पहाटे अल्प आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवराज पाटील एक सुसंस्कृत, सभ्य व्यक्तीमत्व होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. शिवराज पाटील राजकारणात होते तेव्हा काँग्रेस-शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत होते. तरीही त्यांच्यातील वेगळेपणा आवर्जुन सांगावा वाटतो, तो म्हणजे त्यांच्यावर ज्या ज्या वेळी काँग्रेसने जबाबदाऱ्या दिल्या त्या त्यांनी परीने यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला.
शिवराज पाटील संरक्षणमंत्री होते, लोकसभा अध्यक्ष होते आणि त्याहीपेक्षा गृहमंत्री म्हणून काम करत असताना 26/11 चा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता. ही अशी नैतिकता हल्लीच्या राजकारणामध्ये फार अभावाने आढळते. एखादी गोष्टी ज्यात आपण अपयशी ठरलो किंवा त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे हे हल्लीच्या राजकारणात दिसत नाही, पण त्यावेळी त्यांनी शिवराज पाटील यांनी दाखवले होते. खाते माझ्याकडे आहे आणि मी जनतेचे रक्षण करू शकलो नाही किंवा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिला. जेव्हा ते राजकारणात होते तेव्हा काँग्रेस, शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत होते. पण ज्याच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या आपण मानल्या पाहिजेत आणि त्यांच्याकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजे.
आदित्य ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर ह्यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. लातूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते. निष्ठावान काँग्रेस नेते, कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कार्य नेहमी स्मरणात राहील, असे ट्विट करत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर ह्यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.
लातूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते. निष्ठावान काँग्रेस नेते, कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कार्य नेहमी स्मरणात…— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 12, 2025




























































