मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांशी चर्चा

4075

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महाराष्ट्रातील सद्यस्थितीबाबत दूरध्वनीवरून चर्चा झाली. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्राने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात केलेल्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा तीन मे रोजी संपणार आहे. कोरोनाची स्थिती अन्य देशांच्या तुलनेत नियंत्रणात असली तरी प्रादुर्भाव व रुग्णांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे रेडझोन मधील लॉकडाऊन आणखी काही काळ वाढवावा लागेल अशी भूमिका काही राज्यांनी घेतली असून तीन मे पूर्वी केंद्र सरकार याबाबत पुढील निर्णय घेणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरध्वनीवर प्रदीर्घ चर्चा झाल्याचे समजते. यावेळी मुंबईसह राज्यातील एकूण स्थितीची, ग्रीन झोन मधील जनजीवन सुरळीत होण्यासाठी राज्य सरकारने शिथिल केलेले निर्बंध, परराज्यातील मजुरांसाठी सरकारने सुरू केलेले निवारा केंद्र व पुरेशी दक्षता घेऊन त्यांना आपल्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते.

राजकीय स्थितीबाबतही चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधीमंडळाचे सदस्य नसल्याने त्यांना 27 मेपर्यंत विधीमंडळाचे सदस्य व्हावे लागणार आहे. विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होणारी निवडणूक कोरोनाच्या संकटामुळे लांबणीवर गेल्याने राज्यपाल नियुक्त सदस्यांपैकी रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या एका जागेवर उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करावी अशी शिफारस करणारा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने दोन वेळा मंजूर करून राज्यपालांकडे पाठवला आहे. राज्यपालांनी अजून याबाबत निर्णय न घेतल्याने राज्यात अकारण अस्थिरता निर्माण झाली आहे. याबाबतही मुख्यमंत्री व पंतप्रधान यांमध्ये बोलणे झाल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या