आता इतिहास घडणार नाही, आम्ही घडवणार!! उद्धव ठाकरे यांचा ठाम विश्वास

1550

भंडारा उचलून ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा नारा दिला आहे. आता या लोकशाहीच्या युद्धात इतिहास घडणार नाही, तर आम्ही इतिहास घडवणार आहोत, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केला.

ते प्रामाणिकपणे आले आणि म्हणाले, आम्हाला काही नको. आम्ही ज्या समाजाचे नेतृत्व करतो त्या समाजाने आमच्यावर विश्वास टाकला आहे त्याला न्याय मिळवून द्या. याचे कौतुक करीत उद्धव ठाकरे म्हणाले, समाजाला न्याय मिळवून देणारे सरकार नसेल तर ते सरकार काय कामाचे? तुमच्यापैकी आज कोणीही आमदार, खासदार नाही, मात्र तुम्ही आमच्यासोबत आहात. हीच ताकद मला हवी आहे. साधीसुधी माणसंच इतिहास घडवतात, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी ओबीसी, भटके-विमुक्त समाजाचे नेते प्रकाश शेंडगे, हरिभाऊ राठोड, मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष युनूस मणियार आणि रिपब्लिकन जनशक्तीचे अर्जुन डांगळे यांनीही विचार मांडले. उद्धव ठाकरे हेच आम्हाला न्याय मिळवून देतील असा आम्हाला ठाम विश्वास असून म्हणूनच आम्ही शिवसेनेसोबत कायम राहू, असा शब्दच या नेत्यांनी दिला.

ही सोबत आता सोडायची नाही
महाराष्ट्रातील प्रत्येकाला अन्न, वस्त्र आणि निवारा देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे असे सांगून उद्धव ठाकरे यांनी तुमच्या मागण्यांचा आता येणाऱया आमच्या सरकारमध्ये मीच पाठपुरावा करणार असे आश्वासन नेत्यांना दिले. तुम्ही सोबत आलात, पण ही सोबत आता सोडायची नाही. समाज समाज जोडतच महाराष्ट्र होतो आणि हा महाराष्ट्र घडवण्यासाठी तुमची साथ मोलाची आहे. लोकशाहीतील युद्धाला सुरुवात झाली आहे. आता रणांगणात उतरूया आणि डौलाने भगवा फडकवूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मित्रपक्षांना ‘जागा’ दाखवायची हा त्यांचा प्रश्न
युतीचे जागावाटप झाले आहे. आता भाजपने त्यांच्या वाटय़ाला आलेल्या जागांचे काय करायचे आणि मित्रपक्षाला कोणती जागा दाखवायची म्हणजे द्यायची तो त्यांचा प्रश्न आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात हाणला. भाजपने मित्रपक्षांना 18 ऐवजी 14 जागा दिल्याने त्यांच्यात नाराजी असल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेने ठरल्याप्रमाणे भाजपला जागा सोडल्या आहेत. त्यानंतर त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मी काही बोलणार नाही.

लोंबकळणारे प्रश्न सोडवणारच
गेली 70 वर्षे या समाजांचे प्रश्न सुटलेले नाहीत. आता यानंतर केवळ यांचेच नाही तर लोंबकळणारे सर्व प्रश्न आम्ही सोडवणारच, असे उद्धव ठाकरे ठामपणे म्हणाले. या अगोदरच्या युती सरकारमध्ये सरमिसळ होती. कारण आम्ही दोघे निवडणूक स्वतंत्रपणे लढलो. नंतर आम्ही एकत्र आलो. त्यामुळे त्यांनी दिलेली काही आश्वासने असतील, आम्ही दिलेली काही वचने असतील. या सगळय़ांची सांगड घालत घालत आम्ही कारभार केला. या काळात मराठा, धनगर या समाजाच्या मागण्या पूर्ण करून त्या अमलात कशा आणायच्या यासाठी पावले टाकली गेली. धनगरांना आरक्षण देताना आम्ही आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. त्यामुळे यासाठी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जात आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात उद्धव ठाकरे यांनी धनगर, कुणबी, माळी, तेली, वंजारी, ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या नेत्यांशी प्रदीर्घ चर्चा केली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे अभिवचनही दिले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी या सर्व समाज नेत्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ऐन लढाईच्या वेळेला जे सोबत येतात ते खरे साथी, ते खरे सोबती. विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाची चर्चा सुरू असताना या नेत्यांपैकी एकजणही आला नाही. आता

मावळे पुन्हा एकदा भगव्यासोबत
छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीतील मावळय़ांची ताकद एकत्र करून मोगलांचे तख्त उलथवून टाकले. आज तेच घडत आहे. अनेक जातींचे मावळे पुन्हा एकदा भगव्यासोबत येत आहेत. हा इतिहास पुन्हा घडत आहे, पण आता इतिहास घडणार नाही, तर आम्ही तो घडवणार आहोत. कारण घडणार या शब्दाला काहीच अर्थ नसतो, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, शिवरायांनी दाखवून दिले आहे की, जे अशक्य असते ते शक्य होऊ शकते. असे दैवत ज्या मातीत जन्मले त्यापासून आम्ही जर प्रेरणा घेणार नसू, नुसते पोवाडेच गाणार असू तर त्यात काहीच अर्थ नाही.

आपली प्रतिक्रिया द्या