मुंबई महापालिका आपल्याकडेच राहणार; तुम्ही तयारीला लागा! उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिका आपल्याकडेच राहणार. पालिकेवर शिवसेनेचा भगवाच फडकणार, तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱयांच्या बैठकीत दिले.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱयांना मार्गदर्शन केले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी होणाऱया प्रभागरचनेची चिंता तुम्ही करू नका. ज्यांच्याकडे सत्ता आहे ते वॉर्ड पुनर्रचना करणारच, त्यांना ती करू द्या. आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरूया, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.

निवडणुकीत गाफील राहू नका

निवडणुकीच्या कामांची तयारी करताना एकमेकांशी समन्वय साधा. एकदिलाने काम करा. काही अडचणी आल्या तर वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधा. गाफील राहू नका, असा सल्लाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या तयारीबाबतही त्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.