
मुंबईवरील हल्ला परतवून लावण्यासाठी पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी गोळय़ा झेलून अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या शौर्य, धैर्य आणि समर्पणासमोर नतमस्तक होण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहीदांना मानवंदना दिली.
मुंबईवरील हल्ला हा दहशतवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारा होता. हा हिंदुस्थानच्या आर्थिक राजधानीवरील हल्ला होता. देशाच्या विकासाला खीळ घालण्याचा हा प्रयत्न मुंबईकरांनी उधळून लावला. त्यामध्ये मुंबई पोलिसांनी शौर्याची परिसीमा गाठली. केवळ मराठीच नव्हे तर सबंध भारतीय मनोधैर्य एकवटले. वीर जवान तुकाराम ओंबळे यांनी निःशस्त्र असतानाही क्रूरकर्म्या दहशतवाद्याला जेरबंद करण्यासाठी बलिदान पत्करले. पोलीस व एनएसजी कमांडोंच्या या शौर्याने भ्याड हल्ल्यांना भीक न घालण्याचे, आव्हानांवर मात करण्याचे मनोधैर्य आणखी उंचावेल. ते पुढच्या पिढय़ांमध्ये विकसित व्हावे यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया. हेच या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आणि निष्पाप बळींना अभिवादन ठरेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहीदांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

























































