सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तोवर सीमा भाग केंद्रशासित करा! उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत महत्त्वपूर्ण सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. वातीही बाहेर काढून ठेवल्या आहेत. आता फक्त पेटवायचा अवकाश आहे!

‘एक इंचही जागा देणार नाही’ अशी भूमिका जशी कर्नाटक सरकारने मांडली तशी धमक आपल्यामध्ये नाही का?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांवर कानडी अत्याचार सुरूच आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात, एक इंचही जागा देणार नाही… ही कौरवी वृत्ती आली कुठून? महाराष्ट्रातील नेत्यांना कारवाईच्या धमक्या देतात. ही काय मोगलाई लागून गेली का? आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यावर ब्र काढायलाही तयार नाहीत, असे सांगतानाच, जोपर्यंत सीमा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित झालाच पाहिजे  असा ठराव करा, अशी महत्त्वपूर्ण सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळात केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हिवाळी अधिवेशनात ठराव मांडण्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. परंतु पहिल्या आठवडय़ात त्यांनी तो ठराव मांडलाच नाही. आज विधान परिषदेत नियम 97 अन्वये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सीमाप्रश्नी चर्चा व्हावी, असा प्रस्ताव मांडला. त्याला विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी संमती दिली. मुख्यमंत्र्यांचा या मुद्दय़ावर ठराव येणार आहे, पण 97 अन्वये विरोधी पक्षाने प्रस्ताव मांडला आहे त्यावर चर्चा होऊ द्या, असे संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

कर्नाटककडून महाराष्ट्राबाबत सातत्याने वादग्रस्त विधाने केली जात आहेत. सीमा भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. कृषी, पाणी, वीज, आरोग्य यांसारख्या सुविधा मराठी बांधवांना मिळू नयेत म्हणून व्यत्यय आणला जात आहे असे सांगत अंबादास दानवे यांनी या मुद्दय़ावर विरोधी पक्षाच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी बोलावे, अशी विनंती दानवे यांनी केली.

हा माणुसकीचा लढा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर सर्वांचे एकमत झाले याबद्दल पक्षभेद बाजूला ठेवून मी सर्वांचे अभिनंदन करतो असे सांगत उद्धव ठाकरे यांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले की, ‘‘मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या न्याय्यहक्कांसाठी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. 1956च्या आधीपासून हा सीमा प्रश्न सुरू आहे. भाषावार प्रांतरचना होण्याच्या कितीतरी आधीच्या काळापासून सीमा भागात मराठी ही मातृभाषा म्हणून मुरलेली आणि रुजलेली आहे. तेथील कित्येक पिढय़ा मराठीमध्ये बोलत आल्या आहेत. शिक्षण घेत आल्या आहेत. दैनंदिन व्यवहार करत आल्या आहेत. हा दोन भाषांचा नाही तर माणुसकीचा लढा आहे.’’

‘‘देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली. जवळपास तेवढाच काळ किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ सीमा भागातील मराठी माणसे मराठी भाषेत बोलत आहेत. आम्हाला महाराष्ट्रात जायचे आहे असे सांगत आहेत. त्यासाठी लोकशाही मार्गाने त्यांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. आंदोलने केलेली आहेत. ठरावही मंजूर झाले आहेत,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

या वेळी उद्धव ठाकरे यांनी सभागृहात एक पेन ड्राइव्ह सादर केला. ते म्हणाले की, ‘‘विरोधी पक्षात आले की पेन ड्राइव्ह येतात अशी पद्धत सध्या आली आहे. या पेन ड्राइव्हमध्ये सत्तरच्या दशकात महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपूर्वी बनवलेला ‘केस फॉर जस्टीस’ हा एक माहितीपट आहे. साधारण 18व्या शतकापासून मराठी भाषा कशी वापरात होती त्याचे पुरावे त्यात आहेत. जुन्या पाटय़ा, प्रशासकीय कामकाजाचे मराठी कागद, महिला मंडळे व इतर संस्था कशा मराठीत होत्या, शाळा कशा मराठीत होत्या त्याचे पुरावे या माहितीपटात आहेत, असे सांगतानाच हा माहितीपट दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवण्यात यावा, जेणेकरून नव्या पिढीतल्या सदस्यांना आपण हा सीमा प्रश्नाचा ठराव का आणतोय हे कळू द्या,’’ अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली.

सीमा प्रश्नावर माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या एका पुस्तकाचा दाखला देतानाच उद्धव ठाकरे यांनी त्या पुस्तकाची झेरॉक्स प्रत सभागृहात सादर केली. सीमा प्रश्नावर हिंदुस्थानचे माजी सरन्यायाधीश महाजन यांनी अहवाल दिला होता. त्याची चिरफाड अंतुले यांनी या पुस्तकात केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते पुस्तक सर्व सदस्यांना द्यावे, असेही ते म्हणाले. अशी पुस्तके दुर्मिळ होऊ लागली आहेत असे सांगतानाच, हळूहळू मराठीचा ठसा पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘‘हा प्रश्न केवळ भाषावार प्रांतरचनेचा नाही तर माणुसकीचा आहे. माणूसकीने वागायला हवे. सीमा वाद सुरू झाल्यापासून मराठी माणसाने महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड भाषिकांवर अत्याचार केल्याचे असे एकतरी उदाहरण दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कर्नाटक सरकार मात्र तेथील मराठी भाषिकांवर अत्याचार करतेय, खोटे गुन्हे दाखल करतेय, मारपीट करतेय, असे ते म्हणाले.

तेव्हा मुंबई दहा दिवस जळत होती

सीमा प्रश्न हा शिवसेनेचा जिव्हाळ्याचा विषय आहे असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याशी निगडित घटनेचा दाखला या वेळी दिला. ‘‘मोरारजी देसाई हे त्या वेळी मुंबईत येणार होते आणि माहीमच्या नाक्यावर त्यांना सीमावासीयांकडून निवेदन दिले जाणार होते. परंतु मोरारजी त्या वेळी आले, पण त्यांची गाडी थांबलीच नाही. त्यांची पायलट कारही सर्वांना बाजूला करत वेगाने गेली. त्यात एका शिवसैनिकाच्या पोटावरून गाडीचे चाक गेले. एक पह्टोग्राफर जखमी झाला आणि अचानक तुफान लाठीमार सुरू झाला. दगडफेक सुरू झाली. अश्रुधूर सोडले गेले. त्याच रात्री शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह मनोहर जोशी, दत्ताजी साळवी यांना अटक झाली. तीन महिने ते येरवडा तुरुंगात होते. दहा दिवस मुंबई जळत होती. लष्कर आणण्याचे प्रयत्न करून मुंबई शांत होत नव्हती. त्या वेळी शिवसेनाप्रमुखांनी तुरुंगातून आवाहन केले तेव्हा मुंबई एका क्षणात शांत झाली होती,’’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्या वेळी सीमाप्रश्नी लढणारे नेते बाबुराव ठाकूर, सायनाक यांच्याशी शिवसेनाप्रमुखांच्या बैठका व्हायच्या, असेही ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुखांनी त्या वेळी जनरल करिअप्पा हे कर्नाटकातील असूनही त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली होती, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आपले भाषेचे भांडण नाही असे शिवसेनाप्रमुख त्यांना म्हणाले होते. करिअप्पा यांचा मुलगा पाकिस्तानात युद्धबंदी होता. करिअप्पा जनरल होते हे समजल्यानंतर तुमच्या मुलाला सोडून देतो असे पाकिस्तानने करिअप्पांना सांगीतले होते. पण केवळ माझा मुलगा आहे म्हणून त्याला सोडायचे नाही, इतर युद्धबंदी सुटतील तेव्हाच त्याला सोडा असे करिअप्पांनी निक्षून सांगितले होते. ही देशभावना कर्नाटकातल्या लोकांमध्ये आहे त्याचा आम्ही आदर करतो. पण आता म्हटले जातेय की, एक इंचही जागा देणार नाही. हे ज्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलेय त्यांचे नेते काय करताहेत? संजय राऊत हे चीनचे एजंट आहे म्हणतात. हा कुठून शोध लावला? आम्हाला कर्नाटकातील एक इंचही जागा नकोय, तुम्ही जी आमची जागा घेतली आहे ती आम्हाला हवी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

वाद उफळला की आपण दोनचार गाडय़ांच्या काचा पह्डतो. पण तिकडे कर्नाटक सरकार बेळगावात विधानसभा बांधते. तिथे उपराजधानी बनवते. पण आपण काहीच करत नाही. बेळगावच्या महापालिकेने महाराष्ट्रात जायचेय असा ठराव मंजूर केला तेव्हा कर्नाटकने ती महापालिका बरखास्त केली होती. महाराष्ट्रात काही ग्रामपंचायतींनी आम्हाला कर्नाटकात जायचे आहे असे ठराव केले. आपण पक्ष बाजूला ठेवून त्यांच्यावर काय कारवाई करणार आहोत? त्यांच्यावर आपण काय शिस्तभंगाची कारवाई करणार आहोत का? राजद्रोहाचा खटला भरणार आहोत का? तुम्ही जिंकल्या म्हणून सांगता त्या ग्रामपंचायतीच जर महाराष्ट्राच्या विरोधात ठराव करत असतील तर त्या बरखास्त करणार का त्याचाही निकाल लागला पाहिजे, नुसतेच चुईंगम चावल्यासारखे थट्टा केल्यासारखे बोलू नका, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. रोजचे व्यवहार कानडी भाषेत करावे लागतात. या विषयावर कर्नाटकात सरकार कोणाचेपण असो ते एकजुटीने उभे राहतात. हे आपण त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.

आपल्याच महापुरुषांचा अपमान आपण सहन करणार असू तर कर्नाटक आपला भाग मागणारच असे सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘‘कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र अत्याचार भोगत आलेला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा संयमही संपत चालला आहे. पण आज नाही तर कधीच नाही अशा जिद्दीने आपण उभे राहत नाही तर केवळ बडबड करून अर्थ नाही. सीमा भाग केंद्रशासित झालाच पाहिजे, तेथील कानडी अत्याचार थांबलाच पाहिजे आणि संपूर्ण प्रशासन केंद्र सरकारने ताब्यात घेतले पाहिजे,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मुख्यमंत्र्यांचे विमान अर्ध्यावर बोलवले जाईल… चर्चा व्हायलाच हवी

मुख्यमंत्री शिंदे हे एका कार्यक्रमानिमित्त दिल्लीला गेल्याची चर्चा होती. त्याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सीमाप्रश्नी चर्चा करणार असू तर पूर्ण माहिती घेऊन धाडसाने चर्चा व्हायला हवी. मुख्यमंत्री येतील की नाही मला माहिती नाही. त्यांना दिल्लीतून कधी सोडतील? का निघाल्यावर अर्ध्यातून परत बोलावतील? पण आजच्या आज हा ठराव व्हावा आणि दोन्ही सभागृहांत संमत होऊन केंद्राला पाठवावा, अशी माझी विनंती आहे.’’ यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी मुख्यमंत्री हे नांदेडला गुरू गोविंदसिंग यांना अभिवादन करण्यासाठी जाणार असून ते आजच परततील, अशी माहिती सभागृहात दिली.

तेव्हा लाठय़ा खाणारे आता सीमापार

सीमा प्रश्नासाठी आम्हीसुद्धा लाठय़ा खाल्ल्या असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले होते. त्याची आठवण करून देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सीमा प्रश्नासाठी लाठय़ा खाल्ल्या असे काही जण विधानसभेत बोलले होते. पण त्यांनी लाठय़ा खाल्ल्या तेव्हा ते आमच्या पक्षात होते. आता ते सीमा पार करून दुसरीकडे गेले. तेव्हा लाठय़ा खाल्ल्या म्हणून आता गप्प बसायचे असा त्याचा अर्थ होत नाही! प्रश्न हा उद्भवतो की, किती काळ मराठी माणसाने लाठय़ा खायच्या? अत्याचार सहन करायचे, रक्त सांडायचे? किती काळ गप्प बसायचे? किती काळ आपण चर्चा करत बसायचे?’’ असे प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर कर्नाटक सरकार ज्या आग्रहाने भूमिका मांडतेय तशी आपले सरकार मांडतेय का? आम्ही काय केलेय, तुम्ही काय केलेय ते ठेवा बाजूला. आपण काय करणार आहोत हा आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दोन्ही मुख्यमंत्री केंद्रात बसलेल्या पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना आपला नेता मानतात. ते गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात प्रश्न आहे तोपर्यंत दोन्ही राज्यांनी ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवायची असे ठरले असताना परिस्थिती महाराष्ट्राने नाही, तर कर्नाटकने बिघडवली.

नवस फेडण्यासाठी शिंदे दिल्लीत

महाराष्ट्रात सत्तेत टिकून राहावे यासाठी एकनाथ शिंदेंनी नवस केला आहे. हा नवस फेडण्यासाठी ते सतत दिल्लीच्या वाऱ्या करत असतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

एकाच देशातील ही दोन राज्ये असताना हा तंटा सोडवण्याची जबाबदारी कुणाची? केंद्र सरकार पालक आहे, पण पालकासारखे वागतेय का?

बोम्मई अमित शहांच्या भेटीला

शिंदेंपाठोपाठ कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईही दिल्लीत पोचले. उद्या ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

असे राज्यकर्ते असतील तर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा काय?

कर्नाटकच्या एकाही मंत्र्याने कधी महाराष्ट्रात येऊन जन्म व्हावा असे म्हटलेले ऐकिवात नाही. पण आपले मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात ‘जन्म घ्यावा कर्नाटकातच’, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी पाटील यांनी कन्नड भाषेत केलेल्या त्या भाषणाच्या ओळीही सभागृहात वाचून दाखवत असे राज्यकर्ते महाराष्ट्रात असतील तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची, असा संतप्त सवालही त्यांनी केला.