
विधानभवनाच्या लॉबीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. जोरदार मारामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही जर का परिस्थिती राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
हे समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिलेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मग तो कोणीही असू देत. ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव समोर आलं पाहिजे. कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांचीही दिशाभूल केली गेली का? हा पण विषय आहे. मात्र, अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे, अशी चिंता उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ताबडतोब मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे. तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचा आहात, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला घेरले.
‘हिंदीची सक्ती हवीच कशाला?’ उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीसांना दिले पुस्तक भेट
त्यांचं व्यक्तीगत काहीही असेल तर तो त्यांचा मुद्दा आहे. पण हे विधानभवन आहे. विधानभवनाच्या प्रांगणात एवढा कडेकोट बंदोबस्त असताना देखील हे पास घेऊन आले होते का? आणि कोणाच्या मार्फत पास दिले गेले? त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.