उद्धव ठाकरे सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा

महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी दोन ठाकरे एकत्र यावेत अशी मराठी माणसांची इच्छा आहे. याला शिवसेनेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार आहे, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, असे वक्तव्य शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी आज केले. शिवसेनेने चर्चेची दारे बिलकूल बंद केली नव्हती, असेही ते म्हणाले.

अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद बोलवून पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत काही निर्णय झाला का, असे त्यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर बोलताना ते म्हणाले की, दोन्ही प्रमुख नेते भेटतील, चर्चा करतील आणि ठरवतील. दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते जो निर्णय घेतील त्यानुसार पुढे जाऊ. शिवसेना चर्चेसाठी सकारात्मक आहे, आता राज ठाकरे यांनी एकत्र यायचे की नाही हे ठरवायचे आहे, असे आमदार परब म्हणाले. दोन्ही सेना या पक्षनेतृत्वाचे ऐकणाऱ्या आहेत. त्यामुळे नेतृत्व जो निर्णय घेईल तो अंतिम असेल, असेही ते म्हणाले.

भुजबळांना घेऊन भाजपने आपल्याच भूमिकेला तिलांजली दिली

छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबद्दल अनिल परब यांनी यावेळी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. भाजपने ज्याचा सतत विरोध केला होता तो विरोध झुगारून भुजबळांना मंत्रिपद दिले आणि आपल्याच भूमिकेला तिलांजली दिली, असे ते म्हणाले. आयुष्यभर संघर्ष करूनही सत्तेचा लाभ घेता आला नाही आणि दुसरीकडे ज्यांच्याकडून सत्ता काढून घेतली त्यांनाच पुन्हा सत्तेत घेतले जात आहे म्हणून भाजप कार्यकर्ते दुःखी आहेत, असे ते पुढे म्हणाले.

महापालिका ओरबाडायचीय म्हणून निवडणूक पुढे ढकलली जाईल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना अनिल परब म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आरक्षणाबाबत जो निर्णय दिला आहे त्यानुसार उर्वरित महाराष्ट्रात ओबीसीचा निर्णय न्यायालयाने लावला आहे. जिल्हा परिषद, नगर पंचायत निवडणुका सरकारला चार महिन्यांत घ्याव्या लागतील. मुंबई महापालिका निवडणुकीत आरक्षणाचा विषय नाही. इथे फक्त जागा 227 की 236 हाच प्रश्न होता. यावर कुठलीही स्थगिती नाही. सरकार उद्याही निवडणूक घेऊ शकते, पण ते घेणार नाहीत. कारण त्यांना प्रशासकाच्या माध्यमातून महानगरपालिका ओरबाडायची आहे, अशी टीका अनिल परब यांनी केली.