
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांची नाशिकमध्ये झंजावाती सभा पार पडली. या सभेला शिवसैनिकांनी व मनसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. कडाक्याच्या थंडीतही ठाकरेंच्या संयुक्त सभेला नाशिक मध्ये तुफान गर्दी जमली होती. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व गद्दारांची चांगलीच सालटी काढली.
”गेल्या दोन वर्षात नाशिकमधली ही माझी चौथी सभा. पण आज जास्त आनंद होतोय कारण आजच्या सभेत माझा भाऊ व मनसेचा अध्यक्ष राज माझ्यासोबत आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात नाशिकमध्ये केलेली कामं सांगितली व मुंबईत शिवसेनेनी केलेली काम तर तुम्ही बघितली आहेत. त्यामुळे विचार करा जर हे दोन भाऊ एकत्र आले तर काय होईल”. असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात शहरात सारख्याच समस्या आहेत. मग या भाजपवाल्यांनी गेल्या दहा वर्षात केलं काय?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
यावेळी त्यांनी भाजपच्या दोन्ही भाऊ सत्तेसाठी एकत्र आल्याच्या आरोपाला देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. ”होय आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय मग तुम्ही सर्व काय लपंडाव खेळायला एकत्र आला आहात का? हो आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय आणि ती सत्ता आम्हाला तुमच्या विकासासाठी, भविष्यासाठी, भवितव्यासाठी राबवायची आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
”मुलाखतकार एक प्रश्न नेहमी आम्हाला विचारतात की ही तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे का? मला त्यांना सांगायचं आहे की, आमच्या अस्तित्वाची चिंता तुम्ही करू नका. अनेक निवडणूकांमध्ये आम्ही पराभव पचवला आहे. विजय फार थोडा नशिबी आला. त्यामुळे इतके पराभव पचवूनही आम्ही पाय रोवून उभे आहोत. त्यामुळे आमच्या भविष्याची चिंता तुम्ही करू नका”, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
”भाजपचं हिंदुत्व खरं आहे की चुनावी हिंदुत्व आहे. भाजपने राम मंदिर केलं म्हणून डंका पिटला. पण तेच प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्येला बसले त्या तपोवनातील झाडं आता ते कापणार आहेत. तिथली झाडं कापली तर भविष्यात लोकांना काय दाखवणार? प्रभू रामंचद्र तपश्चर्येला कुठे बसले होते विचारल्यावर काय दाखवणार? नमो भवन का? की शासकीय विश्रामगृहात प्रभू रामचंद्र राहिले असं सांगणार, यांना सगळ्याचा संपूर्ण सत्यानाश करायचा आहे. सगळे अंधभक्त झाले आहेत. तुमच्यावर धर्माची एक अशी मोहिनी टाकायची आणि तुम्हाला स्वप्नात गुंगवून टाकायचं असं सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”देवेंद्र फडणवीस ज्यांनी हे शहर दत्तक घेतलेलं. ज्यांना राजकारणात पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतात. ते काय शहर दत्तक घेणार, असा टोलाही यावेळी त्यांनी फडणवीसांना लगावला, पुढे ते म्हणाले की, भाजप आज उपटसुंभांचा पक्ष झाला आहे. गेल्या वेळेला नाशिकच्या सभेत आपल्या व्यासपीठावर जी माणसं होती त्यातली आज काही कमी झालीयत असं कळलं. पण तरिही आज व्यासपीठ हाऊसफुल्ल आहे. आमच्याकडे पोरांचा तोटा नाही. अस्सल निष्ठावान अजुन इथेच आहेत. आम्ही मोठी केलेली माणसं गेली असतील पण ज्यांनी मोठी केली तो निष्ठावंत आजही आमच्यासोबत आहे. मला भाजप वाल्यांना विचारायचं आहे की काय जीणं तुमच्या नशिबी आलंय. सलिम कुत्ताचा साथिदारासोबत फोटो. तुम्हाला पक्ष पळवायला कुत्ता बिल्ली चालतो. अशी बरबटलेली लोकं पक्षात घ्यायची. त्यांची लंगोटी साफ सुफ करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं हे निष्ठावंतांच्या नशिबी आलंय. मला वाईट निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचं वाटतंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
”मला वाईट देवयाणी ताईंचं वाटतंय. ताई तुम्ही पक्षाशी निष्ठा ठेवताय. भाजप हा उपऱ्यांचा पक्ष झालाय. हे माझं वाक्य नाही. देवयानी ताईंचं आहे. दलालांनी ब्रिफींग केलंय हे देवयाणी ताईंनी म्हटलं आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाहीत. शनी शिंगणापूरला संकटग्रस्त जातात तर भाजपमध्ये जे येतायत ते ईडी सीबीआय ग्रस्त येतायत. सगळे चोर दरोडेखोर येतायत. ज्या रामाने रावणाचा वध केला त्या रावणाला देखील ते भाजपमध्ये घेतील एवढे निर्लज्ज झालेयत. कुठे आहे यांचे हिंदुत्व? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
भाजपने पाठीत वार केला म्हणून काँग्रेससोबत गेलो. मी काँग्रेससोबत गेलो तेव्हा हे म्हणाले की मी हिंदुत्व सोडलं. आता हे भाजपवाल्यांनी अकोटमध्ये एमआयएमसोबत युती केली. अंबरनाथमध्ये काँग्रेसमध्ये युती केली. समविचारी म्हणजे काय? सगळे भ्रष्टाचारी येतायत, चोर दरोडेखोर येतात त्यांना सोबत घेऊन चालले आहेत. गणेश नाईक म्हणाले की जर केंद्रातील भाजपने परवानगी दिली तर यांचे घोडे पलटी करेन, नव्या मुंबईती या मिंध्यांनी एफएसआयचा घोटाळा केला आहे. गणेश नाईकांना मला सांगायचं आहे की मग त्या टांग्यात पाय तरी कशाला घालायचा, करा ना तो पलटी, अशी ही यांची अभद्र युती आहे यांची, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईत जिजामाता उद्यानात आम्ही पेंग्विन आणले तेव्हा आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पण त्या उद्यानात लोकं तिकीट काढून पैसे भरून पेंग्विन बघायला लोकं येत आहेत. पण तुमच्या सभांना तुम्ही पैसे देऊन पण लोकं येत नाहीत. ही तुमची किंमत. पेंग्विन एवढी किंमतही तुमची नाही. , अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
आज नाशिकमध्ये आम्ही जो वचननामा प्रसिद्ध केलाय, तो वचननामा आहे आमचा, तो ठाकरेंचा शब्द आहे, मोदींची बोगस गॅरंटी नाही. ठाकरे जे बोलतायत ते करतात, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने राहुल नार्वेकरांच्या घरातील तीन तीन चार चार लोकांना उमेदवारी दिली आहे. समोरच्या उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा यासाठी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आय़ोगाला चालतोय, यांनी काहीही केलं तरी चालतं कारण निवडणूक आयोग शेपूट घालून बसलाय. आज जर आपण उठलो नाही तर हा वरवंटा असा फिरेल की पुन्हा एकदा इंग्रजांपेक्षा जास्त यांच्या गुलामगिरीत रहावं लागेल, हा हिंदुत्वाचा बुरखा आहे. यांना तपोवनाचा मह्तव नाही. इथे तपोवन कापतायत, तिथे आरे कापतायत, आरवली कापतायत. नियोजन शून्य विकास सुरू आहे.





























































