
मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना बळ देण्यासाठी शिवसेना मैदानात उतरणार आहे. तरुणांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या निष्ठुर भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेनेने आंदोलनाची हाक दिली आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर 19 जुलै रोजी हे आंदोलन होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.
नीट, सीबीएसईसह अनेक परीक्षांमध्ये झालेली पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी सोनम वांगचुक व कॉक्रोच पार्टीची मागणी आहे. या मागणीसाठी वांगचुक हे 19 दिवसांपासून उपोषण करत आहेत. मात्र सरकारने वांगचुक यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सर्वत्र तीव्र संताप आहे. सोशल मीडियातही लोकांचा रोष पाहायला मिळत आहे. सरकारविरोधातील हा रोष आणि असंतोष रविवारी सायंकाळी मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार आहे.
हा लढा सर्वांचा
देशाच्या तरुणांचा आवाज बनण्यासाठी तमाम जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेने ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून केले आहे. हा लढा सर्वांचा आहे, कुणा एका राजकीय पक्षाचा नाही! सगळ्यांनी जमूया, देशाच्या तरुणांचा आवाज बनूया, अशी साद शिवसेनेने घातली आहे.
आम्ही ऋणी आहोत!
वांगचुक यांना पाठिंबा म्हणून मुंबईत आंदोलनाची हाक दिल्याबद्दल सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ‘न्याय आणि उत्तरदायित्वासाठी सुरू असलेल्या या लढ्याला आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही सदैव ऋणी आहोत, असे त्यांनी नमूद केले.






























































