गोरगरीबांच्या दोन घासांच्या आड येऊ नका, नाहीतर गाठ शिवसेनेशी; उद्धव ठाकरे यांचा सज्जड दम

885

 

राज्यात सर्वत्र भगवे तुफान उसळले आहे. गोरगरीबांचे कष्टकऱयांचे कल्याणकारी राज्य येणार म्हणजे येणारच! गोरगरीबांना दहा रुपयांत पोटभर जेवण देणार म्हणजे देणारच! हे शिवसेनेचे वचन आहे. दहा रुपयांत कसे जेवण देणार अशी पोटदुखी अनेकांना सुरू झाली आहे. आताच कसे हे सुचले असा सवाल केला जात आहे. बोलेन ते करून दाखवणारच असा शिवसंस्कार आमच्यावर झाला आहे. त्यामुळे काळजी करू नका आणि दीनदुबळय़ांच्या दोन घासांच्या आड येऊ नका, नाहीतर गाठ शिवसेनेशी आहे, असा सज्जड दम आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. आम्हाला सत्ता पाहिजेच पण ती तुमच्यासाठी, तुमच्या भल्यासाठी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मॅच खेळायचीय पण समोर कुणीच नाही
क्रिकेटची ट्वेंटी-ट्वेंटी मॅच सुरू आहे. पण समोर कुणीच प्रतिस्पर्धी नाही. कुणाबरोबर खेळायचे? काँग्रेसच्या अशोक चव्हाणांबरोबर? ते तिकडे पडलेत नांदेडच्या एका कोपऱ्यात. परवा संगमनेरात गेलो होतो. बाळासाहेब थोरात… अन् आम्ही जोरात! ते थोरात म्हणाले, मी बाजीप्रभू आहे म्हणे! बाजीप्रभू कुणासाठी लढले? शिवरायांसाठी! हे कुणासाठी लढताहेत, सोनिया गांधींसाठी. बाजीप्रभूंच्या नखाची तरी सर यांना येणार आहे का, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

शरद पवार आरसा बघा!
शरद पवार वणवण करताहेत. वयाने मोठे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे. भ्रष्टाचारावर बोलतात. आरसा बघा, तुमचेच प्रतिबिंब त्यात दिसेल. शरद पवार म्हणाले, हे सरकार पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आता मला सांगा, 2014 च्या निवडणुकीत युती नव्हती. निकाल लागल्याक्षणी भाजपसमोर लोटांगण कुणी घातले? याच शरद पवारांनी. भाजपने न मागताच प्रफुल्ल पटेलांनी पाठिंबा जाहीर केला होता आणि आता आम्हाला काय शिकवता! आमची युती ही समान विचारावर, हिंदुत्वाच्या धाग्यावर झाली आहे. यांना ना आचार ना विचार. गेली पाच वर्षे युती सरकारने काम केलेच ना. शिवसेनेची भक्कम साथ होती म्हणून हे शक्य झाले. जनतेने आम्हाला स्वीकारले आहे. हे जनतेच्या मनातील सरकार आहे. त्यामुळे शरद पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी ते पडणार नाही असा जबर आत्मविश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

सिल्लोडमध्ये भगवा जनसागर
सिल्लोड येथे पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची सभा झाली. यानिमित्ताने भगवा जनसागरच उसळला होता. सकाळपासूनच सिल्लोडच्या जिल्हा परिषद मैदानाकडे शिवसैनिकांचे जथे वाजतगाजत निघाले होते. भगवे झेंडे, भगवे रुमाल आणि गगनभेदी घोषणांनी वातावरण भारून गेले होते. सभेच्या वेळेपर्यंत मैदान तुडुंब भरले. पाय ठेवायलाही जागा उरली नाही. दुकानांच्या पायऱया, रस्ता गर्दीने भरून गेला. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी अगदी झाडावरही शिवसैनिक चढून बसले. बऱयाच वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सिल्लोडला आले होते तेव्हाही असेच गर्दीचे तुफान उसळले होते. या आठवणीने अनेकांच्या डोळय़ांत पाणी तरळले.

पैशाच्या मुजोरीला धडा शिकवा
गंगाखेडमध्ये धनुष्यबाणच अधिकृत उमेदवार आहे. दुसरा तिसरा कोणीही नाही. आमदारामुळे मतदारसंघाची ओळख होत असते. ज्यांनी या मतदारसंघाला बट्टा लावला. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जे तुरुंगात खितपत पडलेत. भ्रष्टाचार ज्यांच्या रक्तात भिनला आहे. तो आज प्रचार करतोय. युतीच्या नेत्यांचे फोटो बॅनरवर लावतोय. हा प्रचारातला भ्रष्टाचारच आहे. आमचे फोटो कशाला लावतोस? या कारखानदाराने तुमचा पैसा लुटला. वाट्टेल तेव्हढा भ्रष्टाचार केला. आता हाच पापाचा पैसा निवडणुकीत उधळत आहे. पैशाच्या मुजोरीला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. भ्रष्टाचाऱयांना डोक्यावर घेऊन मिरवायचे नसते. रासपचे महादेव जानकर यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. अशा भ्रष्टाचाऱयांमुळे त्यात वितुष्ट येऊ नये अशा कडक शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालम येथील जाहीर सभेत खडसावले.

गद्दारांच्या छाताडावर डौलाने भगवा फडकवा!
परभणी जिल्हय़ातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भगवा झंझावात दुपारी नांदेड जिल्हय़ात दाखल झाला. लोहा-कंधार मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुक्तेश्वर धोंडगे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची रणरणत्या उन्हात दणदणीत सभा झाली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी गद्दारांचा जबरदस्त समाचार घेतला. यांना आमदार केले, खासदार केले तरी यांचा सत्तेचा मोह सुटत नाही. अशा गद्दारांना गाडण्याची वेळ आता आली आहे. गद्दारांना धडा शिकवून त्यांच्या छाताडावर भगवा डौलाने फडकवा असे जबरदस्त आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी करताच उपस्थित जनसमुदायाने टाळय़ांच्या कडकडाटात त्याला जोरदार प्रतिसाद दिला.

सिंधुदुर्गात बुधवारी तोफ धडाडणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ बुधवारी 16 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गात धडाडणार आहे. पहिली सभा कणकवली येथे गडनदीजवळच्या मैदानात दुपारी साडेतीन वाजता, त्यानंतर कुडाळ येथे सायंकाळी 4.30 वाजता एसटी डेपोसमोरील विस्तीर्ण मैदानात आणि त्यानंतर तिसरी सभा सावंतवाडी शहरातील गांधी चौक येथे सायंकाळी 7 वाजता होणार आहे. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, कणकवलीतील उमेदवार सतीश सावंत, कुडाळचे वैभव नाईक आणि सावंतवाडीतील दीपक केसरकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात दिली.

आपली प्रतिक्रिया द्या