
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून गुरुवारी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथील शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सात बारा कोरा करण्याबाबत दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत त्यांच्या भाषणाची ऑडियो क्लीपही ऐकवली. निवडणुकीआधी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू म्हणत होते, आता शेतकरी विचारताहेत कुठे पळाला मत चोरा, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
मी इथे जाहीर सभा घ्यायला किंवा मत मागायला आलेलो नाही. मी तुम्हाला हिंमत द्यायला आलो आहे. माझ्या हातात असतील त्या अधिकाराचा उपयोग जनता, शेतकऱ्यांच्या हितासाठी करायचा आहे. पण आज अशी परिस्थिती आहे की संकट आल्यावर सगळे फोटो काढायला येतात. फोटो लावून मदत कार्य होते. मराठवाड्यात फिरताना विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील शेतकरीही आम्हाला काही मिळाले नाही म्हणत आहेत. मग नेमके पैसे जाताहेत कुठे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
हजारो कोटींचा भ्रष्टाचार होत असून यांनी मुंबई महापालिका तर लुटून खाल्ली, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. अदानीच्या सिमेंटच्या पोत्याला कधी हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो का? असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. पण यांचे बगलबच्चे मस्त कमावून ऐशोरामात राहत आहेत. दुसरीकडे शेतकरी ऊन, पाऊस, थंडीत मेहन करतो, त्याच्या कष्टाला योग्य हमी भाव मिळाला नाही तर कर्जफेडीची चिंता लागेल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी सोने पिकवतो, पण एका रात्रीत मातीमोल होते. मातीही वाहून गेल्याने खरडून गेलेल्या जमिनीचे करायचे काय असा प्रश्न त्यांना पडलेला आहे, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी फडवणीस यांच्या भाषणाचा ऑडियोही ऐकवला. यात ते शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार आहोत. शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा.. कोरा.. कोरा… असे म्हणताना दिसतात. यावरून उद्धव ठाकरे त्यांच्यावर हल्ला चढवतात. निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा सात बारा करू कोरा, अरे आता कुठे पळाला मत चोरा, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याच्या आश्वासनाचे काय झाले याचाही समाचार घेतला. लाडकी बहीण योजना बंद करू नका. पण निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 1500 रुपये नाही तर 2100 रकुपये लाडक्या बहिणींना द्या अशी मागणी त्यांनी केली.
मराडवाड्यातील शेतकऱ्याचे न भूतो असे नुकसान झाले आहे. आयुष्यात कधी आले नव्हते असे संकट आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत मराठवाडा दुष्काळग्रस्त होता. पण कालच्या पावसाने नदीपात्रातून आलेल्या लोंढ्यांनी जमीन खरडून गेली. विजेचे खांब पडले. पूल, रस्ते वाहून केले. मी शेतकऱ्यांच्या व्यथा विचारताना मुख्यमंत्री म्हणतात, उद्धव ठाकरे टोमणे मारतात. पण शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मिळाले पाहिजे हा टोमणा आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
शेतकऱ्यांसाठी 31800 कोटींचे पॅकेज जाहीर केले म्हणतात. पण यातील प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात किती आले? असा सवाल केल्यावर उपस्थित शेतकऱ्यांनी हा पैसा रस्ते, पूल यासाठीच दिले असून आम्हाला रुपयाही मिळाला नसल्याचे म्हटले. याचाच अर्थ शेतकरी मेला तरी चालेल, पण कॉन्ट्रॅक्टर मित्र जगला पाहिजे. यालाच मुख्यमंत्री विकास म्हणतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. शेतकऱ्यांना सहा रुपये, तीन रुपये मदत मिळत असून अशी थट्टा आजपर्यंत कुणी केली नव्हती. एक रुपयात पीक विमा बंद, शिवभोजन बंद, आनंदाचा शिधा बंद, हे सगळे बंद आणि यांचे दुकान चालू. हे खोऱ्याने पैसे ओढत आहेत आणि आता यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. यांना शेतकऱ्याचे काही नाही. पण आम्ही सगळे लढतोय. मला हे बघवत नाही, फसवेगिरी सहन होत नाही म्हणून आलो आहे. आजपर्यंत मी जे बोललो ते केलेले आहे आणि जे बोलेन ते करून दाखवणार आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी त्यांनी अजित पवार यांचीही ऑडियो क्लीप ऐकवली. यात अजित पवार सात बारा कोरा केला नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही असे म्हणताना दिसतात. ही निर्दयी, खोटी माणसं आहेत. निवडणुकीत काहीतरी कोपऱ्याला गूळ लावतील आणि मत मागतील. त्यामुळे जोपर्यंत कर्ज माफ होत नाही, पिकविम्याचे पैसे करत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करणार नाही, असा तुम्हाला निर्धार करायचा आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.



























































