
कलाकृती विकत घेता येऊ शकते पण कला ही विकत दिली किंवा घेतली जाऊ शकत नाही. आमच्याकडील काही कलाकृती काहीजणांनी विकत घेतल्या हे खरं, पण कलाकार जागेवर आहे, तोपर्यंत अशा अनेक कलाकृती घेऊन जाण्याचा प्रश्न पडत नाही, असा सणसणीत टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाणला. नवी मुंबईतील फोटोग्राफी सोसोायटी ऑफ इंडिया आणि भारतीय विद्याभवनाच्या माध्यमातून 21 व्या पीएसआय आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन 2023 चं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी पुरस्कार विजेत्या छायचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना उद्धव ठाकरे बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले , कलेचा वारसा मला माझ्या वडिलांकडून लाभला आहे. पूर्वी माझी एक मुलाखत घेतली होती आणि मुलाखतकाराने विचारले होते की, तुमचे वडील शिवसेनाप्रमुख, एक मोठे राजकीय नेते आहेत आणि उत्तम व्यंगचित्रकार पण आहेत. त्यांच्याकडून एकच कोणता वारसा घ्यायचा असेल तर कोणता घ्याल? त्यावर मी क्षणाचाही विलंब न लावता कलेचा वारसा घेईन असे सांगितले होते. समोरचा अवाकच झाला. मी त्यांना सांगितले की, मी एवढ्यासाठी सांगतो की कला ही रक्तात असावी लागते. आपण कलाकृती विकत घेऊ शकतो पण कला ही घेतली आणि दिली जाऊ शकत नाही. म्हणून आमच्याकडील काही कलाकृती काहीजणांनी विकत घेतल्या हे खरं, पण कलाकार जागेवर आहे, तोपर्यंत अशा अनेक कलाकृती घेऊन जाण्याचा प्रश्न पडत नाही. आणखीन कलाकृती निर्माण करु. पाहिजे तर प्रदर्शन करतो आणि कोणाला विकत घ्यायचे असेल त्यांना घ्या सांगतो असा सणसणीत टोलाही त्यांनी यावेळी हाणला.
पुढ त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, मी कॉलेजमध्ये असताना ज्या रस्त्यावरून जायचो तिथे पहिले जहांगीर आर्ट गॅलरी लागायची. आठवड्यातून दोन फेऱ्या तरी जहांगीरला व्हायच्या. तेव्हा माझे स्वप्न होते की, कधीतरी या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आपलं प्रदर्शन करायला पाहिजे असं वाटत होतं आणि म्हणता म्हणता तीन प्रदर्शन झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

























































