
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंगोली जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. उद्धव ठाकरे यांची पहिली सभा वसमत येथे पार पडल्यानंतर दुसरी सभा सेनगाव येथे पार पडली, या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंधे गटावर टिकास्त्र सोडले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या देशातील शेतकरी जर उभा ठाकला तर यांची हुकुमशाही नांगरून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात केला आहे.
”आपल्याकडे सत्ता नाही, यांनी आपला पक्ष चोरलाय, चिन्ह चोरलंय. त्यांच्याकडे सगळा चोरीचा मामला आहे. यांना लाज लज्जा शरम काहीच नाही. त्यामुळे या संतांच्या भूमीचं पावित्र्य तुम्हाला राखायचे आहे. संताच्या भूमीत जे गद्दारीचे जंत जन्माला आले त्यांना चिरडायचे आहे. मराठवाडा ही संताची भूमी आहे जंताची नाही. नामदेव महाराजांचं जन्मस्थळ आहे. मी नामदेव महाराजांच्या जन्मस्थळाला 65 कोटींचा निधी दिला होता. मी शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या जिर्णोद्धारासाठी पैसे दिले होते. मंदिरांसाठी पैसे दिले होते. या सगळ्यासाठी कशाला हवेत पैसे सगळे पैसे माझ्याच खिशात पैसे आले पाहिजे असा विचार करूनच या गद्दारांनीा आपलं सरकार पाडलं. गद्दारीचं सगळं फसफसलंय. मी पुन्हा येईन बोलणारे देवेंद्र फडणवीस बेशरमपणे बोलले की मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो आहे. मिंधे जे सांगतायत की उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडलं. त्याचा खुलासा या फडणवीसांनी केला आहे. त्यांनीच सांगितलं की दोन पक्ष मी कसं फोडले. आता हाच पुरावा न्यायालयात द्यायला पाहिजे कसे हे फोडाफोडी करतात. हा घरफोड्या बसल्यावर आपली घरं सुरक्षा राहतील का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
”शिवसेनाप्रमुखांची एक पद्धत होती की ते निवडून आलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना त्याच्या कार्याचा अहवाल मतदारांसमोर ठेवला पाहिजे. अरविंद सावंतांनी त्यांच्या कार्याचा अहवाल सादर करा. मोदी, शहा, फडणवीस यांनी त्यांचा दहा वर्षाचा अहवाल सादर करावा. यांनी फक्त घरं फोडली, पक्ष फोडले, सरकार पाडलं, गद्दारी केली फोडाफोडींनी भरलेल्या कार्याचाल अहवाल ते आपल्यासमोर सादर करतील. हे सर्व अत्यंत भयानक पद्धतीने चाललं आहे. आपल्याला कसं त्यांनी वापरून घेतलं. तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलं. अमित शहांनी मला अडीच अडीच वर्षांचं वचन दिलं होतं. एवढं नालायकपणे वागल्यानंतर शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की पाठीत वार करायचा नाही पण कुणी केला तर त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून मी काढला कोथळा. त्यावेळी भाजपला वाटलां की उद्धव ठाकरे काही करू शकत नाही. तो काही करू शकत नाही. त्याला आपल्याकडे परत. शिवसेनाप्रमुखांचं रक्त माझ्या शरीरात आहे. मी तुमच्यासमोर झुकणार नाही, वाकरणार नाही. पण तुम्हाला मोडून तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. त्याच बरोबरीने यांचे डावपेच आहेत. शिवसेनेला संपवण्याचा कसा घातक प्रयत्न केला आहे. ज्या वेळेला भाजपकडे हिंदुत्व हा शब्दच नव्हता. गांधीवाद घेऊन हे चालले होते. संपूर्ण देशात यांचे दोन खासदार आले होते. 1987 च्या पोटनिवडणूकीत पार्लेची पोटनिवडणूक आपण जिंकल्यानंतर यांना वाटलं की यांच्या दिशेने गेले तर जिंकू शकतो. त्यावेळी यांच्या हवा गेलेल्या रबरी फुग्यात आपण हवा भरली. संकटकाळात ज्या शिवसेनेने मदत केली. भाजपला, मोदींना मदत केली. त्या शिवसेनेलाच खतम करायाला निघालात. हा हिंगोली हा बालेकिल्लाच आहे. इथे फक्त शिवसेनेचा भगवाच फडकला आहे. त्याशिवाय कोणताही फडकं इथे फडकू देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
”इथल्या राजेश कोल्हाड यांची हत्या झाली. पोलिसांना मी दोष देत नाही. आम्ही पोलिसांकडे न्याय मागणार नाही तर का त्या खोकेबाजांकडे न्याय मागायचा? जनता असुरक्षित असेल तर प्रश्न पडतो की पोलीस तरी सुरक्षित आहेत का? मी मुख्यमंत्री होतो तेव्हा खंबीरपणे महाराष्ट्र पोलिसांच्या पाठी उभा राहिलो. माझे पोलीस मजबूत आहेत असं सांगायचो. पण आता पोलिसांना जर तुम्ही हुकुमशाहीच्या हतकड्या घालणार असाल तर पोलिसांना जर तुम्ही तुमच्या हुकुमशाहीच्या हतकड्या घालणार असाल . असा असंतोष खदखदायला लागतो. तेव्हा सगळी जनता रस्त्यावर येते. का सगळ्या माता भगिनी आक्रोष करत आहेत. न्यायमागून मिळत नाही. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना न्यायहक्कासाठी केली होती. मी मुख्यमंत्री असताना एकही उद्योग गुजरातला नेऊ दिला नव्हता. आता सत्तेच्या हव्यासापायी दिल्लीश्वरांची खुर्ची बूट चाटतायत त्या मि्ंधेना सांगायचंय की डोळ्यादेखत महाराष्ट्र लुटला जातोय, सर्व प्रकल्प गुजरातकडे वळवले जातायत. तुमच्या डोळ्यांवर मोत्यांची झापडं लागली आहेत? पंतप्रधान म्हणाले होते की दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ दहा वर्षात 20 कोटी रोजगार उत्पन्न झाले असते. महाराष्ट्रात किती मिळाले व किती आले ते सांगा. एक सुद्धा वचन पंतप्रधानांनी पूर्ण केलेलं नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
”पिकवीमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि आता निवडणूकीच्या तोंडावर तुम्ही अगदी भिक द्यावी तशी दोन दोन हजार आमच्या खात्यावर टाकताय. अख्ख आयुष्य आमचं तुम्ही बरबाद करताय. आमचं आयुष्य अंधारात टाकतायत आणि तुमची पुढची पाच वर्ष आमच्याकडून भिक मागून घेताय. मोदीजीना वाटतं की यवतमाळमध्ये सभा घेतली की त्यांना यश मिळतं. याचा अर्थ तुमचं नशीन त्यांच्या हातात नाही तर मोदींचं नशीब तुमच्या हातात आहे. उद्योगपती कर्ज बुडवून परदेशात पळवून गेले. तसा माझ्या महाराष्ट्रातला एक तरी शेतकरी दाखवा कर्ज बुडवून पळून गेलेला आहे. बँका येतात दारावर जप्तीच्या नोटीसा लावतात. पिक गेलेलं आहे. पिक आलं, तरी हमीभाव मिळत नाही. मुलांचं शिक्षण राहतंय, मुलीचं लग्न होत नाही. तर बाप म्हणून मी लायकीचा नाही असा विचार करून शेतकरी जीव देत आहे. यापुढे महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याने हतबल होऊन आत्महत्या करायची नाही. तुमची ताकद तुम्हाला या सरकारला दाखवून द्यायची आहे. उत्तरेतील शेतकरी दिल्लीपर्यंत जात आहेत. ते शेतकरी दिल्लीत येऊ नये त्यांच्यावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, बंदुका रोखल्या जात आहेत.त्यांच्या वाटेवर काटे खिळे टाकले जातात. माझा अन्नदाता हमीभावासाठी लढत आहे. मोदीजींनी हमीभावाचं वचन दिलं होतं. त्याचीच आठवण करून द्यायला जर तो दिल्लीत येत असेल तर तिथे नाही यायचं. मोदी म्हणतात ये मेरा परिवार है. पण परिवार जेव्हा दिल्लीत येतो तेव्हा त्याच्या अंगावर बंदुका रोखता. आता तुमची वेळ आली आहे. उद्या तुम्ही देखील जायला निघालात तर तुमच्यावरही बंदुका रोखल्या जातील. मग काय करणार तुम्ही? आत्महत्या करणार का? उत्तरेतले शेतकरी आठ नऊ महिने पाऊस थंडी वार्याचा विचार न करता आंदोलन करत राहिले. तेव्हा मोदींना त्यांच्यासमोर झुकायला लागलं होतं, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
”सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे संघाच्या होसमाने यांनी सांगितलं की देशातील शेतकरी हे विध्वंस करणारी ही शक्ती आहेत. अराजक आणणारी ही शक्ती आहे. असं ज्यांच्या मनामध्ये तुमचं रूप असेल त्याच्याकडून तुम्हाला न्याय मिळेल , त्यांना पुन्हा निवडून दिल्यावर तुमचं उत्पन्न दुप्पट होणार का? जसं तुम्ही माझं कोरोना काळात ऐकलं. कुटुंबप्रमुख ऐकलं. त्याच तळमळीने तुम्हाला सांगतोय. जसं कोरोनाचं संकट होतं तसं आता हुकुमशाहीचं संकट आता मला दिसतंय. गद्दारी वगैरे क्षुल्लक आहे. मला ढेकूण मारायला तोफेची गरज लागत नाही. मूळ लढाई आपली हुकुमशाहीशी आहे. माझ्या या संताच्या भूमीत गद्दार जन्माला येता कामा नाही. तसाच माझ्या या देशात हुकुमशाह जन्माला येता कामा नाही. पाच वर्ष ज्या मस्तीत राहिले. आता तुमच्या दारात भिक मागायला येतील. पण आता शेतकऱ्यांनी एकजुटीने ठरवलं ते काहीही करू शकतात. जनता पक्षाच्या काळात इंदिराजींनी आणीबाणी आणली होती. त्या इंदिराजींचा पराभव जनता पक्षाने केला होता.त्या जनता पक्षाचं चिन्ह होते नांगरधारी शेतकरी होतं. आता जर माझा शेतकरी उभा राहिला तर यांची हुकुमशाही नांगरून टाकल्याशिवाय राहणार नाही. नांगरून टाका हुकुमशाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.






























































