
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाच्या विजयोत्सवाबद्दल बोलताना त्याचा रुदाली असा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत भाजपला चांगलेच फैलावर घेतले. ”मराठी माणसाचा आनंदाचा क्षण ज्यांना रुदाली वाटत असेल ती अत्यंत विकृत व हिणकस प्रवृत्तीची लोकं आहेत”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सोमवारी उद्धव ठाकरे हे विधानभवनात आले होते. तिथे शिवसेना आमदारांची बैठक घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
”आम्ही एकत्र आल्यामुळे यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे. ती आग दाखवता पण येत नाही आणि क्षमवता पण येत नाही भाजपचं राजकारण तोडा फोडा आणि राज्य करा असं आहे. लोकांच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि त्यावर आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हा भाजपचा धंदा संपलेला आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांशी केलेल्या तुलनेवर बोलताना देखील उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांची सालटी काढली. ”जे आता मराठीच्या आंदोलनाची हलगाममधील अतिरेक्यांशी तुलना करतायत तेच महाराष्ट्राचे व मराठीचे खरे मारेकरी आहेत. यांना पहलगाममध्ये हल्ला करणारे अतिरेकी सापडत कसे नाही, ते भाजपात गेले का? ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांच्या घरी राहतायत का? लाज वाटली पाहिजे तुम्हाला की एकतर तुम्ही हिंदूंना वाचवू शकत नाही. मराठीम माणसांवरती अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता. हे असे कर्मदरिद्री लोक दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रात राज्यकर्ते आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या रुदाली वक्तव्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ”त्यांची मानसिकता मी समजू शकतो. मूळ भाजपा मेलेला आहे, त्याचाच खून या लोकांनी केला आहे. त्याची जी काही रुदाली सुरू आहे. त्यासाठी ऊर बडवायला त्यांनी आमच्या पक्षातून माणसं घेतली आहे. इतर पक्षातील उरबडवे घेतले आहेत. शिवसेनेसोबत ज्या भाजपची युती होती, अटलजी व आडवाणीजींचाा जो भाजप होता त्याचा यांनी खून केलाय. दुख करायला देखील त्यांच्याकडे ओरिजनल माणसं नाहीत. मराठी माणसाचा आनंद क्षणज्यांना रुदाली वाटत असेल ती अत्यंत विकृत व हिणकस प्रवृत्तीची लोकं आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.