अमेरिका आणि ट्रम्प खिल्ली उडवताहेत, टॅरिफ लादताहेत मग मोदी गप्प का? उद्धव ठाकरे यांचा हल्ला

‘डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर जबर टॅरिफ लादले आहे. ते रोजच्या रोज आपल्या देशाची आणि नरेंद्र मोदींची खिल्ली उडवत आहेत. त्यांना जाब विचारणे सोडाच, आपले पंतप्रधान त्यांच्या विरोधात अवाक्षरही काढत नाहीत. ते गप्प का आहेत,’ असा रोकडा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला घेतला आहे. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ‘हेच करायचे असेल तर निवडणुका घेताच कशाला,’ असे त्यांनी सुनावले.

दिल्ली दौऱयावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या 15 सफदरजंग लेन या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मतदार फेरपडताळणी, अमेरिकेची दादागिरी यासह राष्ट्रीय पातळीवरील विविध मुद्दय़ांवर भाष्य केले. अमेरिकेच्या टॅरिफ दहशतवादावर बोलताना त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. ‘सध्याचे पंतप्रधान, गृहमंत्री हे भाजपचे आहेत. ते देशाचे मंत्री नाहीत. पहलगामला हल्ला झाल्यानंतर तिथे जाण्याऐवजी पंतप्रधान बिहारला प्रचारसभा घेतात. हे लोक केवळ भाजपाचे प्रचारमंत्री म्हणून काम करत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

‘पेंद्रातील सरकारला कोणतीही परराष्ट्रनीती नाही. खंबीर धोरण नाही. देशापुढे टॅरिफ, दहशतवाद, शेतकऱयांच्या समस्या, महागाई अशा अनेक समस्या आहेत. मात्र, सध्याचे सरकार हे राजकीय फायद्या-तोटय़ाच्या गणितात गुंतलेले आहे. कोणता पक्ष पह्डायचा, कोणते आमदार-खासदार विकत घ्याचचे यावर ही मंडळी खलबते करतात. त्यामुळेच देशाला आता देशाचा विचार करणाऱया मजबूत सरकारची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पत्रकार परिषदेला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार अदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, खासदार प्रियंका चतुर्वेदी हे उपस्थित होते.

देशभक्त सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहतायत!

राहुल गांधी यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सच्चा देशभक्त टिप्पणीवरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ‘सुप्रीम कोर्टाचा आम्ही आदरच करतो. मात्र घटनेतील परिशिष्ट 10 नुसार लोकशाही वाचवण्याचे एक प्रकरण न्यायालयात आहे. त्याचा निकाल तीन वर्षांनंतरही लागलेला नाही. घटनेचा सन्मान राखला जातो की नाही याची देशभक्त वाट पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यावरही काहीतरी बोलावे,’ असे परखड मत उद्धव ठाकरे यांनी मांडले.

पाकिस्तानशी क्रिकेट नकोच!

पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याशी कसलेही संबंध असता कामा नयेत, अशी शिवसेनेची भूमिका आहे. भाजपवाले मतलबी आहेत. ते केवळ मतलबाचं बघतात. इकडे लोकांना देशप्रेमाचे धडे देतात आणि जय शहासह सगळ्या मंत्र्यांची मुले दुबईला जाऊन क्रिकेटची मजा घेतात. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद सुरू असताना त्यांच्याशी संबंध ठेवणारे हे सच्चे देशभक्त असूच शकत नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

धनखड आहेत कुठे?

उपराष्ट्रपती पदीचा राजीनामा दिलेल्या जगदीप धनखड यांच्याबद्दलच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी टोलेबाजी केली. धनखड यांना भेटायला जाणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर, ते कुठे आहेत हे माहीत असायला हवे. ते सध्या कुठे असतात. मुळात त्यांना इतक्या तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला हे आधी समोर यायला हवे, असे ते म्हणाले.

मिंध्यांना खोचक टोला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दिल्लीत असल्याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर त्यांनी अधिक बोलणे टाळले. ’कोणी मालकांना भेटायला येत असेल तर त्यावर मी काय बोलणार? गद्दार हा गद्दार असतो. मी टिप्पणी करावी एवढय़ा योग्यतेचेही ते नाहीत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

मत कुठे जाते कसे कळणार?

ईव्हीएम विषयी आधीच अविश्वासाचे वातावरण असताना, निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. हेच करायचे असेल तर निवडणूका घेताच कशाला. सरळ निकाल जाहीर करून टाका. मतदारांना त्याचे मत जाते कुठे हे कळायला नको का, असा प्रश्नही त्यांनी केला.

मित्रासाठी चीन दौरा?

अमेरिका डोळे वटारत असताना आपले पंतप्रधान चीन दौऱयावर चालले आहेत. त्यांचा हा दौरा मित्रासाठी काही नवीन दरवाजे उघडता येतात का यासाठी असल्याचे आम्ही ऐकले आहे. मित्राचा विचार करताना त्यांनी देशाकडेही लक्ष द्यावे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

आम्ही दोघे निर्णय घ्यायला समर्थ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत राजकीय युती होईल का आणि इंडिया आघाडीच्या बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर, ‘आम्ही दोघे भाऊ निर्णय घ्यायला समर्थ आहोत. त्यावर इतरांनी चर्चा करण्याची काही गरज नाही. तिसऱयाशी या सगळ्याचा संबंध नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

अघोषित एनआरसी लागू केलाय का?

बिहारमध्ये फेरपडताळणीत मतदारांना स्वतःची ओळख पटविण्यास सांगितली जात आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ‘सीएए, एनआरसीचा विषय समोर आला तेव्हा ओळख पटविण्याच्या मुद्दय़ालाच विरोध झाला होता. आता मतदारांना तेच सांगितले जात आहे. म्हणजे देशात अघोषित एनआरसी लागू झाला आहे काय? आयोगाने याचे स्पष्टीकरण द्यायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जुन्या संसद भवनातील शिवसेनेच्या नव्या पक्ष कार्यालयाला गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. संविधान सदन, 128 ए या पत्त्यावर असलेल्या या कार्यालयात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव, राजाभाऊ वाझे, भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील-आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर यावेळी उपस्थित होते.

शिवसेना संसदीय पक्ष कार्यालयाला भेट

जुन्या संसद भवनातील शिवसेनेच्या नव्या पक्ष कार्यालयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. सर्वप्रथम कार्यालयातील गणेशमूर्तीला फुले अर्पण करून उद्धव ठाकरे यांनी वंदन केले. त्यानंतर कार्यालय न्याहाळले. सर्व खासदारांचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहाखातर मी येथे आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.