
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचे सरकार न येता ज्यांच्या सभांना खुर्च्या रिकाम्या राहतात ते सत्तेवर येतात हे लोकशाहीतले नवीन गणित समजण्यापलीकडचे आहे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महिलांना 10 हजार रुपये देण्याच्या योजनेचा परिणाम बिहारच्या निकालावर झाल्याच्या मुद्दय़ावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 10 हजार हा एक फॅक्टर आहे, त्याने फरक पडला असेल, पण बिहारमधील जनता रोज जे भोगतेय त्यांच्या मनात इतका बदल होऊ शकणार नाही, असे म्हणत त्यांनी निकालाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले. बरोबरच जे जिंकले त्यांचे अभिनंदन, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातही भाजपला पाशवी बहुमत मिळाले, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला एक महिना लागला होता. बिहारमध्येही बहुमत मिळून नेता निवडीला वेळ लागतोय. कदाचित हेच भाजपच्या बहुमताचे गणित असेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
लोकशाहीचा जीव असलेल्या निवडणुकांवरच घाला घातला जातोय
‘मतदार यादीतील घोळाबद्दल महाराष्ट्रात सर्वपक्षीय मोर्चा काढला गेला. मतदार यादीत दुबार मतदार मोठय़ा संख्येने आहेत, अनेकांचे चुकीचे पत्ते दिले आहेत याचे पुरावे निवडणूक आयोगाला दिले गेले. पण आयोग ढिम्म बसून आहे. काहीच कारवाई केलेली नाही. याला लोकशाही मानायचे का? निवडणुका हा लोकशाहीचा जीव आहे; पण त्या जिवावरच अशा पद्धतीने घाला घातला जात असेल आणि त्यातील पारदर्शकला निघून जात असेल तर त्याला लोकशाही म्हणायचे का?’ असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
लाखो मतदार गायब होणे अनाकलनीय
निवडणूक आयोगाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये 7 कोटी 42 लाख मतदार होते; पण निवडणुकीत 7 कोटी 45 लाख लोकांनी मतदान केले. म्हणजेच जवळपास तीन लाख वाढीव मतदार आहेत. याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे गणितच अनाकलनीय आहे. त्या वेळी 65 लाख मतदारांची नावे मतदार यादीतून गाळली गेली होती ती घेतली गेली की नाहीत हेसुद्धा अजून कळायला मार्ग नाही, असेही ते म्हणाले.
स्वबळाचा निर्णय घ्यायला काँग्रेस स्वतंत्र
काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठय़ावर आहे का, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर उंबरठा हा शब्दच विचित्र आहे, काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे आणि शिवसेनाही स्वतंत्र पक्ष आहे. काँग्रेस निर्णय घ्यायला समर्थ आहे तशीच शिवसेनाही समर्थ आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
प्रादेशिक अस्मिता संपवायला जाल तर राजकारणातून संपाल
प्रादेशिक पक्षांना संपवायला निघालेल्या भाजपला राष्ट्रगीत शिकवण्याची गरज आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. पंजाब सिंध गुजरात मराठा हे सर्व राष्ट्रगीतामध्ये दिलेले आहे. त्या प्रत्येकाचे एक वैशिष्टय़ आहे. ही प्रादेशिक अस्मिता मारायचा प्रयत्न जो कुणी करेल तो पक्ष या देशातून संपल्याशिवाय राहणार नाही. अनेकता में एकता असे आपण म्हणतो. ती अनेकता मारण्याचा प्रयत्न कुणी करेल तर ते सर्व अनेक एक होऊन त्याला राजकारणातून संपवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.































































