
सामना प्रतिनिधी, पुणे
राम मंदिर उभारणीला निवडणुकीपूर्वी सुरुवात करू, असे भाजपचे लोक म्हणत आहेत. पण कोणत्या निवडणुकीपूर्वी, २०१९ की २०५० हे ते सांगत नाहीत. नोटाबंदी एका झटक्यात केली. त्याप्रमाणे राम मंदिर उभारणीचा निर्णयही एका झटक्यात घेऊ शकता. तुमच्याकडे बहुमत आहे. मग राम मंदिर का होत नाही, असा सणसणीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. आधी दाखविलेला विकासाचा मुद्दा बाजूला पडला असून आता जनतेला स्वप्न दाखविण्याचे काम सुरू आहे. जनतेच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघानिहाय आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, राम मंदिर, समान नागरी कायदा, कश्मीरमधील ३७० कलम काढणे हे सर्व केव्हाच व्हायला हवे होते. मात्र, यातील काहीही झाले नाही. भाजपने आता राम मंदिराचं काम सुरू करणार असा प्रचार सुरू केला आहे. भाजपच्या एकूण कारभारावरून वाटतंय की, ते स्वप्न दाखवत आहेत. आधी विकासाचा मुद्दा पुढे केला. आता विकासाचा मुद्दा बाजूला पडला असून, राममंदिराचे स्वप्न पुढे येत आहे. राज्यात शिवसेना आणि भाजप गेली पाच वर्षे सतत भांडत आहेत, तर आगामी निवडणुकीत एकत्र येणार का, या प्रश्नाला उत्तर देताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मागील पाच वर्षांपासून जनतेच्या प्रश्नांसाठी भांडत आहोत. मात्र आगामी निवडणुकीत एकत्र येऊ किंवा नाही माहीत नाही. युतीचा निर्णय एकजण घेत नाही, तर अनेक जण घेतात.
खड्ड्यांची जबाबदारी सर्वांनी घ्यावी
मुंबईतील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारला असता, मुंबईतील खड्ड्यांची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी. एकट्या पालिकेने किंवा सरकारने नाही. खड्ड्यांना सरकार पण जबाबदार आहे आणि पालिका पण जबाबदार आहे. सर्वांनी ही जबाबदारी घ्यायला हवी. एकसुद्धा बळी जाऊ नये हीच सर्वांची भावना आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, दगडूदादा सकपाळ, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचीक, नितीन बानुगडे पाटील, शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, नाशिकचे सहसंपर्कप्रमुख भाऊ चौधरी, पुण्याचे सहसंपर्कप्रमुख बाळा कदम आदी या वेळी उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका संपन्न
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शिरुर, पुणे, बारामती, मावळ, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली. शनिवारी सकाळी साडेनऊ ते साडेचार या कालावधीत या बैठका पार पडल्या.
‘नाणार’ होऊ देणार नाहीच
नाणारमध्ये जी रिफायनरी येणार आहे तिच्यामुळे संपूर्ण कोकणपट्टीच्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. हा विध्वंसक विकास परवडणारा नाही. त्यामुळेच जनतेने या प्रकल्पाला विरोध केला आहे. आम्हीही जनतेबरोबरच असल्याने आमचाही या प्रकल्पाला विरोध आहे. रिफायनरीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ काढायचा असेल तर ते काढू शकतात. मात्र आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी मांडली.
गोंधळ लपवण्यासाठी गीतावाटप
महाविद्यालयांमध्ये भगवद्गीता वाटपाच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी मला ही भगवद्गीता चाळायची आहे, ती नक्की संस्कृतमध्ये आहे की गुजरातीत आहे हे पाहायचे आहे, असा टोला लगावला. महाविद्यालयांमध्ये आजच्या युगाचे शिक्षण मिळायला हवे, परीक्षा वेळेवर व्हायला हव्यात, निकाल वेळेवर लागायला हवा, पेपर फुटता कामा नये या विषयांकडे अधिक लक्ष द्यायला हवे. विद्यापीठांमध्ये चाललेला भोंगळ कारभार झाकण्याचा हा प्रयत्न आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व कारभार सुधारायला हवा हे जास्त महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.































































