कदाचित सरकार बनणार नाही, पण राममंदिर नक्कीच बनेल- उद्धव ठाकरे

81

गणेश तुळशी/ श्रीरंग खरे, अयोध्या

राममंदिराच्या मुद्द्यावरून हिंदूंच्या भावनांशी खेळू नका, निवडणुकीत ‘रामनाम’ आणि नंतर ‘आराम’ हे आता बस झाले! कायदा करा, अध्यादेश आणा, काय वाट्टेल ते करा, पण साऱया जगाला हेवा वाटेल असे भव्यदिव्य राममंदिर अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर उभे झालेच पाहिजे आणि हे जर का तुम्ही करणार नसाल तर यापुढे सरकार कदाचित बनणार नाही, पण राममंदिर मात्र नक्कीच बनेल, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अयोध्येच्या पवित्र भूमीतून मोदी सरकारला दिला.

मंदिर की तुरुंग?
मागच्या चार वर्षांत घटनेच्या चौकटीत आपण अशा किती शक्यता पडताळून पाहिल्या, ते तरी जाहीर करा आणि चार वर्षांत मंदिर निर्माणाचा एकही पर्याय सापडला किंवा नाही, तेही सांगा.

रामजन्मभूमीवरील रामलल्लांच्या दर्शनाचा अनुभव सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, या पवित्र ठिकाणी नक्कीच एक चैतन्य, अद्भुत शक्ती आहे असे मला जाणवत होते. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाचा अनुभव रोमांचित करणारा होता. पण दुर्भाग्य असे की, राममंदिराकडे जाताना आपण मंदिरात जात आहोत की तुरुंगात असा प्रश्न मला पडला होता एवढा तिथे फौजफाटा होता. रामाचा हा तुरुंगवास कधी संपणार, हा खरा प्रश्न आहे. मध्यंतरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्या में राममंदिर था, हैं और रहेगा. भावना म्हणून, धारणा म्हणून हे ठीक आहे, पण मंदिर दिसणार कधी? था, हैं और रहेगा यह सब ठीक हैं, लेकिन दिखेगा कब? तिथे मंदिर दिसत नाही, ते कधी दिसणार ते सांगा?

गेले दोन दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱयावर होते. या अयोध्या यात्रेचा समारोप उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेने झाला. अयोध्या भेटीचे प्रयोजन आणि राममंदिर उभारणीच्या कामी सरकारकडून होणारी हेळसांड याविषयी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेपूर्वी छोटेखानी निवेदन केले. गेले दोन दिवस राममंदिराविषयीची शिवसेनेची भूमिका जगाच्या कानाकोपऱयात पोहोचविल्याबद्दल प्रारंभी प्रसारमाध्यमांचे आभार मानले. अयोध्या यात्रेदरम्यान दिलेल्या सहकार्याबद्दल उत्तर प्रदेश सरकार, पोलीस प्रशासन आणि अयोध्येतील जनतेचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. शनिवारच्या आशीर्वाद सोहळय़ात ज्या संतमहंतांनी शिवसेनेला आशीर्वाद दिले त्या संतमहंतांचेही खास आभार मानतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की, जे काम आम्ही हाती घेतले आहे ते संतांच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.

अयोध्येला येण्यामागे माझा कुठलाही छुपा अजेंडा नव्हता आणि नाही, असे स्पष्ट करून उद्धव ठाकरे म्हणाले की, मी देशभरातील तमाम जनतेच्या मनातील भावना प्रकट करण्यासाठी अयोध्येत आलो आहे. केवळ देशातील नव्हे तर जगभरातील हिंदू राममंदिर होण्याची मोठय़ा आतुरतेने वाट बघत आहेत, पण मंदिराचे काम काही सुरू होताना दिसत नाही. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा राममंदिराचा मुद्दा उचलला जातो. प्रचारादरम्यान ‘रामनाम’ आणि निवडणुकीनंतर मात्र ‘आराम’ असाच प्रकार सुरू आहे. राममंदिरासाठी आता आणखी किती वाट पाहायची? किती दिवस गेले, महिने झाले, वर्षे उलटली, पिढय़ाच्या पिढय़ा बदलल्या, पण आमच्या रामलल्लांचे मंदिर काही अजून बांधून होत नाही हे अत्यंत दुःखदायक आहे.

राममंदिराचे निर्माण आता लवकरात लवकर सुरू व्हायला हवे अशी आग्रही मागणी करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुकांसाठी आता खूपच कमी दिवस उरले आहेत. काही महिन्यांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या सरकारच्या संसदेचे अखेरचे अधिवेशन तेवढे आता शिल्लक आहे. मग या शेवटच्या अधिवेशनात आणा राममंदिराचा अध्यादेश किंवा कायदा करा. आम्ही तर हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून सुरुवातीपासूनच तुमच्या सोबत आहोत. आताही अध्यादेश आणला तर शिवसेना पाठीशी राहील. अध्यादेश आणा, कायदा करा, काय वाट्टेल ते करा, पण हिंदूंच्या भावनांशी खेळणे बंद करा आणि लवकरात लवकर राममंदिराचे निर्माण सुरू करा. या देशातील हिंदू आणि हिंदुत्वामध्ये शिवसेनाप्रमुखांनी ताकद आणि जोशच असा भरून ठेवला आहे की, हिंदू आता मार खाणारा राहिलेला नाही असे बजावून उद्धव ठाकरे म्हणाले की, या देशातील हिंदू आता पावला पावलावर या सरकारला विचारेल, राममंदिर कधी बनविणार? हिंदू आता चूप बसणार नाही. मंदिर वही बनेगा, जल्दही बनेगा हे हिंदूंनी खूप ऐकलेय. हिंदू आता एकच विचारतोय, मंदिर कब बनेगा?

किती शक्यता तपासल्या?
2014 च्या निवडणुकीचा जेव्हा प्रचार सुरू होता तेव्हा भाजपने आपल्या जाहीरनाम्यात राज्यघटनेच्या चौकटीत राहून राममंदिर निर्माणाविषयी तोडगा काढण्याच्या प्रत्येक शक्यतांचा विचार करू असे आश्वासन दिले होते. त्याची आठवण करून देत उद्धव ठाकरे म्हणाले की, मागच्या चार वर्षांत घटनेच्या चौकटीत आपण अशा किती शक्यता पडताळून पाहिल्या ते तरी जाहीर करा आणि चार वर्षांत मंदिर निर्माणाचा एकही पर्याय सापडला किंवा नाही तेही सांगा. मुळात अशा पर्यायांचा विचार देशातील हिंदूंनी आणखी किती काळ करायचा? राममंदिराचा विषय तुम्हाला सुप्रीम कोर्टातच ढकलायचा असेल तर निवडणुकीच्या काळात तरी राममंदिराचा वापर कशाला करता, असा जळजळीत सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. राममंदिर उभारणारच नसाल तर खुशाल जाहीर करून टाका की, ‘भाई-बहनों, हमें माफ करो. अच्छे दिन, 15 लाख रुपयांप्रमाणेच हादेखील एक चुनावी जुमलाच होता असे सांगून मोकळे व्हा, पण हिंदूंशी आणि हिंदूंच्या भावनांशी खेळू नका, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला बजावले.

हे नाही तर कोणते सरकार राममंदिर करणार?
सरकारने मंदिर बनवले नाही तर शिवसेना मंदिर उभारणार काय, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारला आधी असं म्हणू तर देत! मग सरकार तरी काय कामाचे? संसदेच्या अखेरच्या अधिवेशनाची अधिसूचना जारी झाली आहे, मग या अधिवेशनात राममंदिरासाठी वटहुकूम येणार की विधेयक, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, कुठलाही मार्ग निवडा पण मंदिर झाले पाहिजे. ‘ट्रिपल तलाक’चा निर्णय झाला तेव्हा सरकारने कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता काय? नोटाबंदीच्या वेळी तरी कोर्टाला विचारले होते काय? तसाच निर्णय राममंदिरासाठीदेखील होऊ शकतो. हे सरकार मजबूत आहे, ताकदवान आहे आणि हे सरकार राममंदिर करणार नसेल तर मग कोणते सरकार करेल? रामजन्मभूमीवर मंदिर तर होईलच; मात्र सरकारने जर हे मंदिर बनवले नाही तर कदाचित हे सरकार बनणार नाही. पण अयोध्येत राममंदिर मात्र नक्कीच बनेल, असा सूचक इशाराच उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला दिला.

summary- uddhav thackeray slams modi govt over ram mandir at ayodhya

आपली प्रतिक्रिया द्या