मोदी सरकार ‘गॅस’वर, INDIAच्या भीतीने फुकटही वाटायला तयार होतील; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबरला इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत या बैठकीच्या तयारीची माहिती दिली. यावेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

बैठकीला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ”रक्षाबंधन केवळ एका दिवसासाठी असायला नको. राज्यकर्ता म्हटल्यानंतर आपल्या कारभारातला प्रत्येक दिवस महिला सुरक्षित राहतील असा असला पाहिजे. पण दुर्दैवाने असं शासन आपल्या देशात व राज्यात दिसत नाही. मधल्या काळात भाजपने त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं की मुस्लीम महिलांकडून राखी बांधून घ्या. मला असं वाटतं जर तुम्हाला त्याची  सुरुवात करायची असेल तर बिल्किस बानू कडून करा. मणिपूरमध्ये दोन महिलांची धिंड काढली गेली. महिला कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. या सर्व महिलांना सुरक्षित वाटावं असं सरकार आणण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोते. पूर्ण देशाला आपला परिवार मानणारे आम्ही देशप्रेमी आहेत. आम्ही एकत्र आलो आहोत. भारत मातेच्या रक्षणासाठी सोबतच हुकुमशाही, जुमलेबाजी विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत”

”उद्या आमची तिसरी मिटिंग होतेय आणि आजच गॅस सिलिंडरचे दर दोनशे रुपयांनी कमी केले. जसं जसं इंडिया आघाडी पुढे जाईल एक दिवस असा येईल की सरकार सर्व गॅस सिलिंडर फ्री देईल. सध्या सरकारच गॅसवर असल्याने सिलिंडरचे दर कमी केले आहेत. 9 वर्षात कधीच बहिणींची आठवण आली नाही आणि  आता मात्र रक्षाबंधनाला सिंलिडंरचे दर कमी करून बहिणींना भेट दिले जातेय. गेल्या 9 वर्षात रक्षाबंधन, भाऊबीज झाली नव्हती का? ही जनता आहे हे सर्व त्यांना माहित आहे. आता ते काहीही करो त्यांना वाचवणारे कुणी नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.