आयुक्तांची दिलगिरी; वादाला विराम, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समेट

2678
uddhav-thackeray

महासभेवरून आयुक्त संजीव जयस्वाल व नगरसेवक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला आज अखेर विराम मिळाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत हा समेट घडवण्यात आला. माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणा व त्यासाठी स्वतंत्र महासभा बोलवा, अशी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे मागणी करणारे पत्र आयुक्तांनी मागे घेत दिलगिरी व्यक्त केली. ठाणे शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

27 ऑगस्ट रोजी झालेल्या महासभेत प्रशासनाने आणलेले ठराव नामंजूर करण्यात आले, तर काही स्थगित ठेवले. त्यामुळे संतप्त झालेले आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दुसऱया दिवशी झालेल्या महासभेवर बहिष्कार घातला. आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठरावदेखील आणावा अशी सूचना काही नगरसेवकांनी केली. जयस्वाल यांनी महापौर मीनाक्षी शिंदे यांना पत्र लिहून माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणाच, असा आग्रह धरला, तर आयुक्तांना सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी महापौरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले. या प्रकरणावरून आयुक्त व नगरसेवकांमध्ये वादाची ठिणगी पडली होती.

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा घेऊन या वादावर पडदा टाकण्यात आला. यावेळी शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल, सभागृहनेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे आदी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात काही काळ कटूता निर्माण झाली होती, पण आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केल्याने आता वाद मिटले आहेत. त्यामुळे ठाणेकरांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असून विकासावरच लक्ष केंद्रीत करण्यात येईल.
– मीनाक्षी शिंदे, महापौर

आपली प्रतिक्रिया द्या