मनसेचा दीपोत्सव; छत्रपती शिवाजी महाराज पार्क लक्ष दिव्यांनी उजळणार! उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या दीपोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळय़ात मनसेप्रमुख राज ठाकरे सहकुटुंब सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमामुळे संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसर लक्ष दिव्यांनी उजळणार आहे.

दिवाळीनिमित्त मनसेच्या वतीने गेल्या 13 वर्षांपासून छत्रपती शिवाजी पार्क येथे दिमाखदार दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. हा नेत्रदीपक सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी अनेक मान्यवरांसह विविध पक्षांचे नेते, मुंबईकर या ठिकाणी येत असतात. यामध्ये तरुण-तरुणींचा सहभागही मोठा असतो. डोळे दिपवणारा लखलखाट पाहण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी होते. या भव्य दीपोत्सवासाठी या वर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जात असल्याने सोहळय़ाची रंगत वाढली आहे.

असे आहे आकर्षण

दीपोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कला चहुबाजूंनी रोषणाई केली जाणार आहे. शिवाय आकर्षक आकाशपंदीलांनी परिसराची शोभा वाढणार आहे. हा नेत्रदीपक नजारा पाहण्यासाठी दरवर्षी मुंबईकरांची गर्दी होते.

उद्या होणार शुभारंभ

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे 17 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत हा दीपोत्सव होणार आहे. 17 ऑक्टोबर सायंकाळी 6.30 वाजता दीपोत्सवाचे उद्घाटन होईल. या सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाची उत्सुकता वाढली आहे.