शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल, प्रकृतीची विचारपूस

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या भांडूप येथील ‘मैत्री’ या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी शिवसेना आमदार सुनील राऊत, आमदार मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.

शिवसेनेची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेल्या संजय राऊत यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांपासून तूर्त काही दिवस दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यापासून ते भांडूप येथील निवासस्थानी आहेत. गेले काही दिवस ते केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. अशातच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले.

आम्ही रोज संपर्कात आहोत. खूप दिवसांपासून भेटायचे होते आणि आज भेट झाली. भेटून चांगले वाटले. संजय राऊतही फ्रेश दिसले आणि लवकरच तलवार घेऊन मैदानात दिसतील, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.

रुग्णालयातील फोटो केला होता शेअर

‘सामना’साठी लिहिलेला अग्रलेख आणि सलाईनच्या सुया टोचलेला हात, असे छायाचित्र संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर टाकले तेव्हा ‘लवकर बरे व्हा’ अशा शुभेच्छांचा त्यांच्यावर वर्षाव झाला.