
मुंब्य्रातील शंकर मंदिर परिसर येथे 22 वर्षांपासून असलेली शिवसेनेची मध्यवर्ती शाखा मिंध्यांनी बुलडोझर लावून पाडली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी या शाखेची पाहणी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह असंख्य शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी आधी रेतीबंदर परिसरात दाखल झाले. त्यांच्यासोबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हेही होते. रेतीबंदर येथे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते राजन विचारे हेही त्यांच्या स्वागताला हजर होते. उद्धव ठाकरे यांचा ताफा येताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा यावेळी देण्यात आलं. सुवासिनींनी उद्धव ठाकरे यांचं औक्षण केलं. यावेळी ताफ्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. रेतीबंदर परिसरात जोरदार फटाके फोडण्यात आले. रेतीबंदरहून उद्धव ठाकरे यांचा ताफा शाखेच्या दिशेने रवाना झाला.
कौसा येथील शाखेच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 500 पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता. ड्रोनच्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात येत होती. उद्धव ठाकरे या शाखेकडे पोहोचल्यानंतर शिवसैनिकांनी एकाच गर्दी केली. शाखास्थळी उद्धव ठाकरे यांची गाडी थांबल्यानंतर त्यांची पोलिसांशी चर्चाही झाली. ‘इथे शिवसेनेची शाखा होती. ती तोडून मिंधे गटाने कंटेनर ठेवला. तो कंटेनर ठेवण्यासाठी तुमच्याकडून परवानगी मागितली होती का’, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी पोलिसांना केला. त्यानंतर ते शाखेकडे वळले. पोलिसांनी बॅरिगेट्सच्या पुढे जाण्यापासून रोखलं असलं तरी उद्धव ठाकरे यांनी त्या जागेची पाहणी केली.
कौसा येथे 2001 पासून पुनर्वसन केलेली शिवसेनेची मध्यवर्ती शाखा आहे. स्वतःला मिंधे गटाचा म्हणवणाऱ्या राजन किणे याने शाखेत 40 ते 50 गुंडांसह घुसखोरी केली आणि बुलडोझर लावत ही शाखा जमीनदोस्त केली. संतापाची बाब म्हणजे शिवसेनेचे शहरप्रमुख विजय कदम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन किणेच्या गुंडगिरीविरोधात तक्रार केली आणि शाखेबाबतचे पुरावेही पोलिसांना दिले. परंतु हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे असूनही पोलिसांनी किणेच्या काळ्या कृत्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. याची गंभीर दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि शनिवारी सायंकाळी या शाखेला भेट दिली.


























































