
‘कोणत्याही सरकारकडून एक पैसाही न घेता शिवसेनेने मुंबईतील कोस्टल रोड पूर्ण केला. या कोस्टल रोडच्या बाजूला मोठय़ा प्रमाणावर मोकळ्या जागा तयार झाल्या आहेत. त्यांचा वापर मुंबईकरांसाठीच झाला पाहिजे, पण मुंबई महापालिका मराठी माणसाच्या हातून गेली तर ही जागाही अदानीच्या घशात जाईल,’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. ‘मुंबई आपण जिंकणारच, पण ही सगळ्यांसाठीच कसोटीची वेळ आहे. हक्काची मुंबई हातात ठेवायची की अदानीच्या चरणी वाहायची हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. त्यामुळे सजग राहा,’ असे आवाहनही त्यांनी केले.
खारदांडा येथील शिवसेना शाखा क्र. 99 चे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण केले. यावेळी शिवसेना नेते आमदार ऍड. अनिल परब, विभागसंघटक रजनी मेस्त्री, उपविभागप्रमुख चिंतामणी निवाटे, शाखाप्रमुख पांडुरंग वाघे, महिला शाखासंघटक अल्का मंडलिक व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंध्यांवर जोरदार हल्ला चढवला. ‘राज्यातील गद्दार सेना आणि भाजपवाल्यांचे लक्ष कोळी बांधवांच्या जमिनीवर आहे. हा प्रश्न फक्त इथल्या भागाचा नाही. वर्सोव्यापासून कुलाब्यापर्यंत, गोराईपर्यंत जिथपर्यंत मुंबईची हद्द आहे. तिथल्या जमिनीवर यांची नजर आहे, पण ही जमीन गिळणं सोपं नाही. आम्ही ते होऊ देणार नाही. कोणी कितीही आदळआपट करू दे. कोळी बांधवांच्या जमिनीला हात लावला तरी कायद्याने त्याचे हात कलम करून टाकल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
‘लोकप्रतिनिधी कसा पाहिजे. कोळीवाडा आल्यावर नाकाला रुमाल लावणारा की तुमच्यासोबत येऊन बसणारा, तुमचे प्रश्न सोडवणारा, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
कोण आहे हा अदानी?
’चांदा ते बांदा जिकडे-तिकडे अदानीच आहे. कोण आहे हा? हा काय ब्रह्मराक्षस झालाय? सगळं काही त्याला देतायत. सामान्यांनी करायचं काय. मोकळी जागा दिसली की अदानीचा बोर्ड. वरळीतील दोन जागांचा लिलाव होतोय. तीही अदानीलाच जाणार. डम्पिंग ग्राउंड, धारावी, मिठागरं, कुर्ला मदर डेअरी, मुलुंडचं सगळं अदानीला. ही मुंबई आहे की अदानी नगरी, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
गांडुळांनी फणा काढायचा नसतो!
अमित शहा यांना ‘ऍनाकोंडा’ची उपमा दिली म्हणून आदळआपट करणाऱया शहासेनेच्या मिंधेंना उद्धव ठाकरे यांनी झोडपून काढले. ‘टीका ऍनाकोंडावर केली आणि उत्तर गांडुळाची औलाद देते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. ‘गुलामांनी प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळांनी फणा काढायचा नसतो. टाकलेले तुकडे खाऊन गप्प राहायचे असते. पण हा फुत्कार टाकण्याचा प्रयत्न करतोय. यांना हत्यार बनवून मुंबईचं मराठीपण मारण्याचा प्रयत्न होतोय हेच या गद्दारांना कळत नाही,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.
































































