Live – उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण

इस्रोच्या वैज्ञाविकांचे कौतुक करतोय. आज सुर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 ने आकाशात भरारी घेतली आहे.

काल मला एक व्हॉटसअप आला होता. पक्ष चोरला, चिन्ह चोरले पण ठाकरेंनी मुंबईत इंडिया एकत्र करून दाखवला. आपल्याला हुकूमशाहीवनिविरोधातील लढ्यात मानाचं स्थान दिलं आहे. ही आघाडी झाल्यानंतर आपल्यावर टीका करणारे हे ‘इंडिया’ विरोधी आहेत. सकाळचा हा कार्यक्रम नसता तर मी सकाळीच जालन्याला पोहोचलो असतो.

सरकार म्हणजे 1 फुल दोन हाफ आहे. पण कोणाकडेही वेळ नाहीये की राज्यात आंदोलन सुरू आहे. माता भगिनी उपोषणाला बसले आहेत. कालपरवा इंडियाची बैठक सुरू असताना त्यांच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदा सुरू होत्या. इंडिया म्हणजे चिंध्या असं एकजण म्हणाला, अरे तुमच्या चिंध्या-चिंध्या झाल्या असून एक सरकार बनलं ते बघ, ती ठिगळं शिव. इंडियाच्या विरूद्ध बोलायला वेळ आहे, मात्र आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी एकाही मंत्र्याला जावंसं वाटलं नाही.

आता चौकशीचा फार्स करतील
आता ‘सखोल’ चौकशीचा फार्स करतील. किती खोल जाणार आहात? इतके खोल जाणार आहात की वरच येणार नाही.कशाला थोतांड करताय. मी मुख्यमंत्री होतो, मुख्यमंत्र्यांना रोज माहिती दिली जाते की राज्यात काय चाललं आहे. गृहमंत्र्यांना तर ती दिली जातेच. या एक फुल दोन हाफना माहिती नव्हतं का आंदोलन सुरू आहे ते ?

बारसूला मारहाण झाली, वारकऱ्यांवर लाठीहल्ला झाला, आता हा कालचा हल्ला झाला. अजूनही चौकशा सुरू आहेत. ज्या पोलिसांनी कोरोनाकाळात जीवाची बाजी लावून महाराष्ट्र वाचवला ते पोलीस इतके राक्षस होऊ शकतात ?सरकार बदलल्यानंतर पोलिसाचा राक्षस होऊ शकतो ? म्हणजे कोणीतरी यामागे आदेश देणारा आहे. तुमच्या आदेशाशिवाय पोलीस असे वागू कसे शकतात.

मी हिगोलीच्या सभेत बोललो होतो, की सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी. तो कार्यक्रम त्यांना तिथे घ्यायचा होता. म्हणून ते यांच्या मागे लागले होते की उठा…उठा. आंदोलनकर्ते म्हणत होते की कोणीतरी आमच्याशी बोलायला येऊ द्या, आमचं म्हणणं त्यांना सांगू द्या, अचानक बाचाबाची सुरू झाली आणि हा अत्याचार सुरू झाला. एका वृद्धेलाही मारहाण झाली. घरात घुसून पोलिसांनी मारहाण केली. समान नागरी कायदा म्हणजे सगळ्यांना समान सुविधा, त्यालाच मी समान नागरी कायदा म्हणतो.नुसतं एका धर्माच्या विरूद्ध असणं ही समानता नाही. सगळ्यांना मानाचं पान वाढलं पाहिजे याला म्हणतात समान नागरी पद्धती.

तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना, सणांच्या आडवे याल, पण पितृपक्ष पाळाल. घ्या पितृपक्षात अधिवेशन. गणेशोत्सवाच्या काळात अधिवेशन घेण्याचा मी निषेध केला होता. आजही करतो. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारच्या अधिकारांच्या बाबतीत एक निर्णय दिला होता. तो निर्णय मनाविरूद्ध लागला म्हणून पाशवी बहुमताच्या आधारे तुम्ही फिरवलात आणि दिल्लीवर कब्जा मिळवला. मी आता पंतप्रधानांना सांगतोय की विविध समाजाचे बांधवांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत, त्या बांधवांना खास वटहुकूम काढून या बांधवांना न्याय मिळवून द्या.

का तुम्ही त्यांना त्रास देत आहात ? पोलीस घरात घुसून मारहाण करतायत. म्हणजे सरकार तुमच्या दारी, पोलीस तुमच्या घरी हा कोणता प्रकार आहे. असा पद्धतीला तुम्ही लोकशाही मानता ? हीच हुकूमशाही चिरडून टाकायला आम्ही इंडिया म्हणून एकत्र आलो आहोत.

स्वातंत्र्यासाठी अनेक कुटुंबांनी त्याग केला. त्यांच्या बलिदानामुले आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. ते म्हणतात की आम्ही घराणेशाहीच्या आम्ही विरूद्ध आहोत. मी तुमच्या घराण्याबद्दल विचारतच नाहीये, कारण तुमच्या घराण्याला इतिहासच नाहीये. जी लोकं कुटुंबव्यवस्था नाकारतात त्यांना इतरांच्या घराण्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कुटुंबव्यवस्था घराणे हीच तर हिंदूंची संस्कृती आहे. त्याच्या मुळावर तुम्ही घाव घालणार , आणि आमच्या घराणाण्यावर बोलणार. पहिले कुटुंब सांभाळा मग आमच्या घराण्यावर बोला.

2012 साली सिद्धीविनायक मंदिराबाहेर आपण आंदोलन केले होते. सुषमा स्वराज यांनी मला फोन केला होता आणि सांगितले की आम्ही भारत बंद करण्याचे ठरवले आहे. मी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विचारलं. तर ते म्हणाले की गणपतीच्या दिवशी…छे! सणवाराच्या दिवशी आम्ही बंद करणार नाही. मी स्वराज यांना सांगितलं होतं की मी बंद करणार नाही. सिद्धीविनायक मंदिराबाहेर गॅस सिलिंडरसाठी आपण आंदोलन केले होतेय तेव्हा दर काय होता आणि आता दहा वर्षानंतर दर काय आहे हे आपण लोकांसमोर मांडायला हवे. केंद्र सरकारने आता सिलिंडरचे दर कमी केले म्हणजे 5 साल लूट आणि 200 महिन्यांची सूट.

भाजपने डिसेंबरमध्ये सगळी विमाने आणि हेलिकॉप्टर बुक केली आहे. जर तेव्हा निवडणुका झाल्यातर काय ? असा इंडियाच्या बैठकीत काहींनी प्रश्न उपस्थित केला. मी म्हटले होऊ दे, स्वातंत्र्याचा लढा सुरू असताना हेलिकॉप्टर आणि विमाने नव्हती, तेव्हा सामान्य माणूस रस्त्यावर उतरला होता आणि त्याने ब्रिटीशांना देशातून हाकलून लावलं होतं.

2014 ला एक शब्द प्रचलित झाला होता चाय पे चर्चा. आता हे तुम्हा आम्हा सगळ्यांचे काम आहे होऊन जाऊ दे चर्चा. आम्ही तेव्हा तुमच्या सोबत होतो, चहा नाही दिला तरी आम्ही तुमच्या सोबत होतो. कर्नाटकात बजरंगबली की जय हा नारा देऊनही भाजप का हरली ?कारण तिथले लोकं भ्रष्टाचार बघत होतं. तिथे काँग्रेसने 40 टक्के कमिशनचं सरकार म्हणून जो प्रकार केला तो लोकांना पटला होता. मध्य प्रदेशमध्येही तेच होणार आहे, महाराष्ट्रात आपल्याला हेच करावं लागणार आहे. महाराष्ट्रातील सरकार हे लोकशाही मार्गाने नाही तर खोक्यातून जन्माला आलेले सरकार आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर जा, त्यांच्याशी चर्चा करा. शेतकऱ्यांसाठीच्या योजनेचा खरंच तुम्हाला लाभ मिळाला का? महिलांसाठीच्या योजनांचा त्यांना लाभ मिळाला का ? तुमच्या मुलाला नोकरी मिळाली का, शिक्षणाची व्यवस्था झाली का? तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे आले का? हर घर नल योजना पोचली का ?

लोकांचा सरकारवरील विश्वास उडालाय, पण लोकांचा सरकारी जाहिरातीवर त्यांचा विश्वास आहे, हेच आपल्याला खोडायचे आहे. पंतप्रधान आभास योजनांचा काळ आता सुरू होतोय. जानेवारीनंतर चार महिने निवडणुका जिंकण्यासाठी सिलिंडर फुकट द्या आणि वर 500 रुपये द्या, पेट्रोल भरणाऱ्याला लिटर मागे 10 रुपये द्या… देऊ शकतात, कारण एवढं लुटलं आहे, कारण एवढंसं द्यायला त्यांचं काही जात नाही, कारण त्यांना पुढची कमाई करायची आहे.

गॅस स्वस्त झाला तरी डाळी, भाज्या महाग होत आहे. गॅस स्वस्त झाला तरी त्यावर शिजवायचं काय ? याने काही साध्य होत नसेल तर दंगली पेटवायच्या. सत्यपाल मलिक आणि महुआ मोईत्रा जे बोलले आहे ते भयानक आहेत. स्वत:च्या कर्तृत्वाने तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाहीयेत. सगळे भाडोत्री लागतात म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी ही भाजप आहे का ? जे भाडखाऊ असतील त्यांना तुम्ही घेतलं असेल आणखी कोणी भाडखाऊ असतील तर त्यांनाही घ्या. कारण शिवसेना भाड्यावर नाही शिवसेना निष्ठेवर, हिमतीवर आमि जिद्दीवर चालते.

आपल्याकडे खूप नेते आहेत, मात्र त्यांच्याकडे पर्याय नाहीये , त्यांच्याकडे एकच नेता आहे. त्यांनाही आता तो कमी पडायला लागल्याने एकमेव हिंदूहृदयसम्राटांचा फोटो लावावा लागतोय. बजरंगबली की जय म्हणावं लागतंय. आता म्हणतायत की 23 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन करत आहे. म्हणजे ते सांगतील की थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस आमि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या जन्मदिनी हे उद्घाटन करत आहे. ते त्यांच्या कर्तृत्वाने हिंदूहृदयसम्राट झाले, त्यांच्या आशिर्वादाने तुम्ही आहात.

बाळासाहेबांचे काल पोस्टर्स लावले होते की ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत एकत्र आले म्हणून. बाळासाहेबांनी विरोध जरूर केला मात्र त्यांनी शिवसेना कमळाबाईची पालखी वाहायला काढली नव्हती. मी भाजप सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडले असे नाही. जालन्यात माता -भगिनीवर लाठ्या चालवल्यात, हिम्मत असेल तर त्यांच्याकडून राख्या बांधून घ्या. सरकार आपल्या दारी म्हणणाऱ्या या सरकारला दारात उभे करू नका, हाकलून द्या या सरकारला. आम्हीही सरकार चालवले आहे. अडीच वर्षांच्या काळात एकही दंगल होऊ दिली नव्हती.

जे आंदोलनाला बसले आहेत त्यांच्याशी तुम्हाला बोलायला वेळ नसेल तर काय चाटायचे आहे तुमचे सरकार ? म्हणून मी आज मराठा आंदोलकांची विचारपूस करायला चाललो आहे. मराठा समाजाने अनेक आंदोलने केली मात्र त्यांनी कधीही तोल ढळू दिला नाही. मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या अनेक शिष्टमंडळांना भेटलो आहे आणि त्यानुसार काम केले आहे. यांच्या ‘उप’ ने सांगितले होती की मी जे बोलतो ते 100 टक्के झाल्याशिवाय राहात नाही , मग एक- दीड वर्षात केलं का नाही ? तुम्ही काय पावलं टाकली हे लोकांना सांगा.

तुमचं असं म्हणणं असेल की मोदींनी लस शोधली नसती तर? जर त्यांनी लस शोधली असली तर ते तुम्हाला चंद्रावर काय सुर्यावरही घर देऊ शकतात. मुंबई-गोव्याच्या रस्त्यावर 200 वर्ष झाली तरी खड्डा पडणार नाही असं गडकरी म्हणाले होते. मला कळालंच नाही की 200 वर्षे केव्हा झाली.

संजय राऊत, अनिल परब, किशोरी पेडणेकर यांना छळायचं आणि आला नाहीस तर आत जाशील अशा धमक्या द्यायच्या, तुमचेही दिवस येणार आहे आत जायचे. थोडे दिवस राहिले आहेत तुमचे, आनंदात राहा. हेलिकॉप्टरने शेतात जा, आराम करा, आराममंत्री म्हणून एक खातं निर्माण करा. राज्यात दुष्काळ पडायला आलाय मात्र अतिवृष्टीबाधितांना अजून पैसे मिळालेले नाहीयेत.

जशी मनकी बात आहे तशी जनकी बात असली पाहिजे. लोकांचे ऐकले पाहिजे, लोकांना काय हवं आहे. जे देता येणं शक्य नाही ते प्रामाणिकपणे सांगा की हात जोडून सांगा की आम्ही हे देऊ शकत नाहीये. प्रामाणिकपणे सांगितलं तर नकारही स्वीकारतील. खोट्या गोष्टी करून देश आपल्या टाचेखाली घ्यायचा, न्यायालयाचे निर्णय आपल्या सोयीनुसार बदलायचे हे प्रयत्न सुरू आहे. मुंबई आता केंद्रशासित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मी मुख्यमंत्री असताना 2-3 वेळा निती आयोगासमोर बैठका झाल्या मात्र तेव्हा मुंबईचा विकास निती आयोगाद्वारे करण्याचा प्रस्ताव एकदाही आला नव्हता. विकास म्हणजे रोषणाई नाही.

तुमचे जे काही थोडे दिवस राहिले आहेत ते त्यांनी कमी शाप घेण्यासाठी वापरावेत . यांना आशिर्वाद तर मिळणार नाही मात्र शाप तरी घेऊ नका. थोड्या दिवसात केंद्रात जे आपले सरकार येणार आहे, तेव्हा यांनी घेतलेले उफराटे निर्णय केराच्या टोपलीत टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतो की आज मस्तीत येऊ नका कारण तुमचे राज्यकर्ते आज असतील, उद्या नसतील पण उद्या आम्ही आणि तुम्ही एका गावात राहणार आहोत. त्यांची सुपारी घेऊन अडकित्यात सापडू नका. प्रत्येक गाव, वाडी, बांध, पार, सलून, एसटी डेपो जिथे लोकं जमतात तिथे जाऊन लोकांना विचारा केली केंद्राच्या योजनांचा लाभ मिळाला आहे की नाही. खोटं काम करणार असाल आणि हिंदुत्वाचा बुरखा घालणार असाल तर तो आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही.

त्यांच्या योजनांचा पर्दाफाश करायचा आहेच शिवाय आपण केलेली कामे ही लोकांच्या मनात बिंबवावी लागतील. अडीच वर्षांच्या कोरोना काळात झालेले काम ते पुसायचा प्रयत्न करत आहे. माझं आव्हान आहे, सगळ्या महापालिका आणि देशातील सगळ्या राज्यांची चौकशी करा तशीच पीएम केअर फंडाचीही चौकशी करा, याला म्हणतात समान नागरीस कायदा. सगळ्यांना तराजूत टाका, जो जड असेल तो पाताळात जाईल, जो हलका असेल तो आकाशात जाईल.

भाजपने एक कार्यक्रम दिला आहे ‘घर घर मोदी’ मी भाजप कार्यकर्त्यांना म्हणतो की याची सुरुवात तुम्ही तुमच्या घरापासून करा, स्वत:च्या आईला विचारा की उज्ज्वला योजनेमुळे घरी किती सिलिंडर मिळाले, डाळीचा भाव आज किती, बाबांना विचारा की पगारवाढ झाली का? तुमच्या घरात शिक्षणाची सोय झाली का ? नळाला पाणी येतं की नुसताच भाईयों और बहनो असा आवाज येतो ? भाजप कार्यकर्त्यांच्या सतरंज्या, पायघड्या झाल्या आहेत. मी चिडून, कलंक हा शब्द आज वापरणार होतो, काल माता-भगिनींवर जो अत्याचार झाला तो पाहाता जो गृहमंत्री हा कलंक नाही तर दुसरं काय असे मी बोलणार होतो, मात्र आता मी ते बोलणार नाही. मात्र हा गृहमंत्री कसा आहे हे लोकांना सांगण्याचे काम तुम्हाला करायचे आहे.