बेस्ट वाचली ! मुंबईकरांची रोजीरोटीही वाचवली !!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट बंद पडली असती तर रोजीरोटीसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या मुंबईकरांच्या रोजीरोटीवरही संकट आले असते, मात्र ‘बेस्ट’ वाचवून या सर्वांची रोजीरोटी आपण वाचवली. हे फार मोठे काम आहे, असे ठाम प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

‘बेस्ट’च्या नव्या मिनी बससेवेचे शानदार उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी झाले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, डबघाईला आलेली सेवा बेस्ट संपली अशी चर्चा होती. एवढ्या तोट्यातून बेस्ट कशी बाहेर येणार, बेस्ट वाचवणार कोण, कर्मचारी बेकार होणार. पण बेस्ट उपक्रम हा केवळ येथील कर्मचाऱयांच्या रोजीरोटीपुरता मर्यादित नाही हे लक्षात ठेवा. आपण नवीन बेस्ट सेवा सुरू करीत आहोत याचा अर्थ बेस्टच्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार असे नाही. एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही. त्यांच्या हक्काचे जे आहे ते त्यांना मिळायलाच हवे अशी ग्वाहीही उद्धव ठाकरे यांनी दिली.

या कार्यक्रमास शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, उपमहापौर हेमांगी वरळीकर, उपनेत्या विशाखा राऊत, बेस्टचे अध्यक्ष अनिल पाटणकर, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, आमदार राज पुरोहित, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, बेस्टचे सदस्य अनिल कोकीळ, सुहास सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.

संकटाच्या छाताडावर चालून जायला हवे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलेय की मंदी आहे. पण कोणतीही गोष्ट टिकून राहत नाही. एखादे संकट आल्यानंतर त्याचाच बागुलबुवा करून गप्प बसलो तर ते संकट आपल्याला गिळून टाकेल. या संकटाच्या छाताडावर चालून जायला हवे असे ठामपणे सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, महापालिका, अग्निशमन दलाप्रमाणे बेस्टलाही एक इतिहास आहे. पण काळानुसार बेस्टमध्येही सुधारणा करणे आवश्यक होते. सुधारणा केल्या नाहीत तर एक एक गोष्ट बंद पडतात. म्हणूनच बेस्टमध्ये सुधारणा करून नागरिकांची ही सेवा वाचविण्यात यश मिळाले.

ओला-उबेरकडे गेलेला प्रवासी पुन्हा बेस्टकडे आला

मधल्या काळात अर्थमंत्री  निर्मला सीतारामन म्हणाल्या, वाहन उद्योगाला मंदीचा फटका पडला आहे. का पडला तर लोक ओला-उबेरचा वापर करायला लागले. ओला-उबेरचा फटका बेस्टलाही बसला होता; पण ओला-उबेरच्या स्पर्धेमध्ये आपण बेस्टला आणले आहे. स्वस्तामध्ये वातानुकूलित बससेवा नागरिकांसाठी खुली केली. ओला-उबेरकडे सरकलेला प्रवासी पुन्हा बेस्टकडे सरकला आहे हे आता आकडय़ांनी सिद्ध झाले आहे असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

पक्ष कोणताही असो, मुंबईकरांच्या सेवेसाठी निवडून दिलेय याचे भान ठेवा!

यावेळी उद्धव ठाकरे यांनी मंचावर नजर टाकत मिष्कील टिप्पणी केली. इथे बसले आहेत राज… असे पॉज घेऊन पुढे पुरोहित असे बोलताच एकच हशा पिकला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, इथे भाजपसुद्धा आपल्यासोबत आहेच. इथे तर युती आहेच. सगळीकडे युती आहे. हल्ली पटकन काही बोलणे म्हणजे पंचायत होते. गमतीतही काही म्हटले तरी बोभाटा होतो. पण बेस्टमध्ये सर्व पक्ष आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष कुणीही असो, आपल्याला मुंबईकरांच्या सेवेसाठी निवडून दिले आहे याचे भान प्रत्येकानेच ठेवायला हवे असे सांगून बेस्ट प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना शिवसेनेचा पाठिंबा असेल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.