‘यूएफओ’ संशोधकाने दाखवल्या परग्रहवासीयांच्या ममी

उडत्या तबकडय़ा (यूएफओ) आणि एलियन्सविषयी संशोधन करणारे पत्रकार जेमी मॉसन यांनी कथित ‘परग्रहवासीयांचे’ दोन मृतदेह तथा जीवाश्म स्वरूपातील ममी बुधवारी मेक्सिकन लोकप्रतिनिधींच्या काँग्रेसमध्ये सादर केल्यामुळे जगभर एकच खळबळ उडाली आहे. जीवाश्म स्वरूपातील हे अवशेष आपल्या ग्रहावरील उत्क्रांतीचा भाग नसून त्यांची बहुतांश जनुकीय संरचनाही अज्ञात असल्याचे मॉसन यांनी या अधिवेशनात शपथेवर सांगितले.

पेरूतील कुस्को येथील एका ठिकाणी मिळालेले हे लहानखुऱया चणीचे कथित एलियन अवशेष दोन पेटय़ांमधून मेक्सिको सिटीतील संसद अधिवेशन स्थळी आणण्यात आले. येथील जनसुनावणी दरम्यान हे अवशेष दाखवण्याआधी मॉसन यांनी अमेरिकन अधिकारी आणि मेक्सिकन सरकारच्या सदस्यांना उडत्या तबकडय़ा आणि अनोळखी वस्तूंबाबत अनेक व्हीडीओ दाखवले. आपल्या भूपृष्ठाrय उत्क्रांती चक्राचा भाग नसलेले हे अवशेष एखाद्या कोसळलेल्या उडत्या तबकडीतून मिळालेले नाहीत. हे अवशेष एक हजार वर्षांपूर्वीचे असून शैवाळांच्या खाणीत सापडले होते आणि नंतर त्यांचे जतन करण्यासाठी ममी बनवण्यात आली. मेक्सिकोच्या स्वायत्त राष्ट्रीय विद्यापीठातील संशोधकांनी या अवशेषांचा अभ्यास केला असून रेडिओकार्बन डेटिंग तंत्राद्वारे त्यांनी या अवशेषांमधून डीएनए ही मिळवले आहेत. या डीएनएपैकी 30 टक्के डीएनए संरचना अज्ञात असल्याचे त्यांना आपल्याकडील इतर डीएनए नमुन्यांशी तुलना केल्यावर आढळून आल्याचे मॉसन यांनी सांगितले.

मॉसन यांचे आधीचे दावे

मॉसन यांनी याआधीही एलियन सापडल्याचे दावे केले आहेत. मात्र ते कालांतराने फेटाळण्यात आले होते. 2017मध्ये नाझ्का, पेरूमध्येच एलियनचे पाच अवशेष सापडल्याचा त्यांनी दावा केला होता. हे अवशेष प्रत्यक्षात लहान मुलांचे असल्याचे नंतर समोर आले होते.