एचआरडी, यूजीसी दुसऱ्या विश्वातून आली आहे काय? आदित्य ठाकरे यांची खरमरीत टीका

2322

कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय (एचआरडी) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. जगात कोरोनाचे संकट गंभीर बनले आहे हे माहीत असूनही असा निर्णय घेणे म्हणजे एचआरडी आणि यूजीसी दुसऱ्या विश्वातून आली आहे काय, असे म्हणावे लागेल, अशी टीका राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

‘अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत इगो बाजूला ठेवून लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा विचार करा अशी विनंती आपण यूजीसीला केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि यूजीसी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत नाही याचा अर्थ त्यांना देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याची जाणीवच नाही असे म्हणावे लागेल.’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मानसिक त्राण आणि विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याला असलेल्या धोक्याचा विचार करून जगातील टॉपच्या विद्यापीठांनीही परीक्षा रद्द केल्या. आपले मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि यूजीसी मात्र विद्याथ्र्यांवर परीक्षा लादत आहे असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि यूजीसी वगळली तर जगामध्ये कुठेही शैक्षणिक ज्ञान हे एका परीक्षेवर अवलंबून नाही असे ते म्हणाले.

अनेक राज्यांनी अंतिम परीक्षा रद्द करण्याची मागणी केली असतानाही यूजीसीने 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे तर परीक्षेसाठी सुधारीत नियमही जाहीर केले आहेत. जगातील अनेक विद्यापीठे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोनाच्या काळातही परीक्षा घेत आहेत असे उदाहरण यूजीसीने दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या