हेल्पलाइन नंबरमुळे डेटाचोरीचा धोका नाही !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
स्मार्टफोनमध्ये आधारचा हेल्पलाईन क्रमांक सेव्ह असेल तरीही डेटाचोरी होण्याची भीती नसल्याचे यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे. अनेक मोबाईलमध्ये शुक्रवारपासून अथॉरिटीचा टोल फ्री क्रमांक दिसत होता. तसेच काही फोनमध्ये तो सेव्हही झाला होता. त्यावर हा टोल फ्री क्रमांक चुकीचा असल्याचे अथॉरिटीने स्पष्ट केले होते. त्यानंतरही या क्रमांकाबाबत चर्चा सुरूच होती. हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह असेल तर आधारचा डेटा चोरी होऊ शकतो, अशी अफवा पसरली. त्यामुळे हा नंबर सेव्ह असेल तरी डेटाचोरीची भीती नसल्याचे अथॉरिटीने स्पष्ट करत लोकांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे.
मोबाईलमधील जुन्या क्रमांकामुळे फोनचे नुकसान होत नाही किंवा डेटाचोरी होत नाही. त्याचप्रमाणे हादेखील एक क्रमांक आहे. त्यामुळे डेटाचोरी होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे अथॉरिटीने स्पष्ट केले आहे. तरीही लोकांनी सेव्ह झालेला हेल्पलाईन क्रमांक डिलीट करावा असे सांगण्यात आले आहे. आधारचा डेटा चोरी होण्याबाबत अनेक अफवा पसरत आहेत. लोकांनी त्याकडे लक्ष देऊ नये. तसेच सोशल मीडियावरून कोणत्याही अफवा किंवा चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नये, असे आवाहनही अथॉरिटीने केले आहे. हा क्रमांक चुकून अॅड झाला होता, असे गूगलने स्पष्ट केले होते. हा क्रमांक अँड्रांइड ऑपरेटिंग सिस्टममधून आला होता. याबाबत गूगलने माफीही मागितली होती.