उजनी पाणलोट क्षेत्रावर पावसाची अवकृपा, धरणाची प्लसकडे वाटचाल धिम्यागतीने सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या भीमा खोऱयातील 18 धरणांमध्ये अद्यापि समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे भीमा खोरे मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. वरील सर्व धरणे भरल्यानंतरच उजनी धरणात अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध होणार असून, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच भीमा खोऱयात कधी मोठा पाऊस होतो आणि उजनी धरणात पाणीसाठी कधी वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरचे डोंगर, मावळ भाग, लोणावळ्याचा पश्चिम भाग तसेच नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग या सर्व विभागांमध्ये अद्याप मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या नद्यांना अद्यापि पुरेसे पाणी आलेले नाही. या नद्या पुढे भीमा नदीला येऊन मिळतात. यामुळे दौंड येथून उजनीत येणाऱया पाण्याचा विसर्ग वाढतो; परंतु सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस होत असला, तरी उजनी धरण अद्यापि ऊणे 4.61 टक्क्यांपर्यंतच आहे. उजनी धरणात येणाऱया पाण्याचा विसर्ग खूपच कमी प्रमाणात असल्याने अतिशय धिम्या गतीने धरणाच्या टक्केवारीची वाटचाल मायनसकडून प्लसकडे सुरू आहे.

या पावसाळ्याच्या सुरुवातीला काही दिवस उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱया शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. चालू पावसाळी हंगामाच्या सुरुवातीच्या 45 दिवसांत उजनी धरणाच्या 18 धरणसाखळी क्षेत्रात 6529 मि.मी., तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 197 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र, उजनीत समाधानकारक वाढ झालेली नसल्याने शेतकऱयांत निर्माण झालेले आनंदी वातावरण हळूहळू चिंतेत बदलू लागले आहे.

आर्द्रता वाढल्याने बाष्पीभवन मोठय़ा प्रमाणावर घटले

पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारण 15 जूनपर्यंत उजनी धरणाची टक्केवारी तब्बल उणे 23 टक्क्यांपर्यंत गेली होती. त्यात आतापर्यंत 17.77 टक्के वाढ होऊन ती उणे 6.23 टक्क्यांवर आली आहे. सध्या उजनी धरणाची एकूण पाणीपातळी 490.670 मीटर, एकूण साठा 1772.91 दलघमी, तर उपयुक्त पाणीसाठा उणे 69.90 दलघमी व टक्केवारी उणे 4.61 आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 45 दिवसांत 6529 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, यामुळे उजनी धरणात काही प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे. या पावसामुळे हवेतील उष्णता कमी होऊन आर्द्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण 7.50 मि.मी.वरून ते 0.81 मि.मी.वर खाली आले आहे.

दैंड येथून नाममात्र विसर्ग; बंडगार्डन अजूनही कोरडाच

उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱया 18 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात खूप कमी प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळे अद्यापि उजनी धरणाला काहीही फायदा झालेला नाही. दौंड येथून खूप थोडा विसर्ग उजनीत येत आहे, तर बंडगार्डन येथून अद्यापि विसर्ग चालू झालेला नाही. उजनीच्या वरील बाजूस असणाऱया 18 धरणांपैकी जवळपास पाच धरणे 50 टक्क्यांच्या पुढे आहेत. त्यामुळे पावसाचा सांगितलेला अंदाज आणि या धरणाची स्थितीचा विचार केला असता, पुढील काळात भीमा खोरे मोठय़ा प्रमाणात पावसाच्या व दौंड येथून मोठय़ा विसर्गाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.