उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; मुळा,मुठा, पवना आणि इंद्रायणी नदी दुथडी वाहू लागल्या

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील 19 पैकी 14 धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग खाली सोडण्यात येत असल्यामुळे मुळा मुठा पवना व इंद्रायणी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत तसेच बंडगार्डन (पुणे) येथील विसर्ग 28 हजार 456 क्युसेक्स पर्यंत पोहोचला आहे व पर्यायाने दौंड येथून येणाऱ्या विसर्गात वाढ होत असून सध्या 52 हजार 137 क्युसेक्स विसर्गाने पाणी उजनी जलाशयामध्ये येत आहे. या सद्यस्थितीत उजनी धरणाची टक्केवारी 97.68% पर्यंत पोहोचली असून पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उजनीच्या 16 दरवाज्यातून 70हजार क्युसेक्स तर वीज निर्मिती केंद्रातून 1 हजार600 क्युसेक्स असा एकूण 71 हजार 600 न्यूसेक्स विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आलेला आहे. निरा खोऱ्यातील पाचही धरणे ओव्हरफ्लो झाली असून वीर धरणाची टक्केवारी 97% पर्यंत पोहोचली आहे त्यामुळे धरण नियंत्रण विभागाकडून वीर मधून नीरा नदीत 32 हजार 306 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेले आहे. यामुळे नरसिंहपुर येथील निरा भीमा संगमापासून पुढे रात्री आठ नंतर भीमा नदीत 1 लाख 5 हजार क्युसेक्स पेक्षा जास्त विसर्ग राहणार असून या महापूर सदृश्य परिस्थिती मध्ये नदीकाठच्या गावांनी सतर्क व सावधान राहावे असा इशारा जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांचे कडून देण्यात येत आहे.

सद्यस्थितीत भीमा नदीवर असलेले सर्व बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत तसेच नदी काठावरील पिकात पाणी शिरले आहे, नदी काठावरील वाड्या वस्त्यांमधील नागरिक व पशुधन स्थलांतरित करण्यात येत आहे.

महापुराच्या पाण्यात मगरीचे दर्शन…

रविवार दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी बेंबळे वाफेगाव बंधाऱ्याच्या कडेला मोटरसायकल वरून येणाऱ्या युवकांना मगरीचे दर्शन झाले, पहिल्यांदा सर्वजण घाबरले पण नंतर मोटरसायकलच्या प्रकाशातून पाठलाग करून दगड मारून तिला हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केला असता ही मगर झाडाझुडपात निघून गेली यामुळे नदीकाठावर असणाऱ्या वाड्या वस्त्या मधील नागरिकांमधून घबराट निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी उजनी धरणाच्या इंदापूर गेटवर कांही मच्छीमारी कोळ्यांना जाळ्यात एक मगर सापडली होती, परंतु ती लहान होती पण बेंबळे येथे युवकांनी पाहिलेली मगर मोठी असावी अशी चर्चा आहे. याविषयी अधिक सखोल चौकशी केली असता असे समजते की भीमाशंकरच्या सह्याद्री डोंगरात भीमा नदीचे पात्र लहान असून कडेने सभोवती घनदाट झाडी आहे. यामध्ये अनेक जंगली प्राण्यांबरोबरच पाणवट्याच्या कडेला मगरी देखील राहत असाव्यात. सध्या पावसाळ्यामुळे भीमेच्या पाण्यात वाढ झाली आहे, हे पाणी पुढे पारगाव-दौंड येथून उजनी धरणात येते. सध्या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे, त्यामुळे अशा मगरी पाण्यातून नदी प्रवाहात येत असाव्यात असा धरण काठावर राहणाऱ्या व मच्छीमारी लोकांचा अंदाज आहे.

.
सोमवार 28 जुलै सायंकाळची उजनी ची स्थिती..

पाणी पातळी 496.725 मीटर
एकूण साठा 115.99 टीएमसी
उपयुक्त साठा 52.33 टीएमसी
टक्केवारी 97.68%