उजनीत मुबलक पाणीसाठा असूनही सोलापूर शहरात सहा दिवसांआड पाणीपुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उजनी धरणात यंदाच्या वर्षी मुबलक पाणीसाठा असूनही सोलापूर शहरात पाण्याचा ठणठणाट सुरूच आहे. प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांना पाच-सहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांत संतापाची भावना आहे.

सोलापूर शहरात गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू असताना, औज बंधाऱयातील पाण्याची पातळी खालावल्याने शहरवासीयांना पाच ते सहा दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या खोदकामामुळे पाइलपलाइन फुटत असून, लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

दरम्यान, सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱया उजनी धरणात गतवर्षीपेक्षा यंदा जादा पाणी आहे. सध्या 74.57 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या वर्षीचा उन्हाळा खरे तर सोलापूरकरांना सुसह्य जायला हवा; परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची समस्या भेडसावत आहे. यंदा धरणात 63.87 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणात मुबलक पाणी असतानाही शहरवासीयांना ढिसाळ नियोजनामुळे पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.