आता जर्मनी काय पाठवणार आहे उश्या? युद्धाच्या छायेतील युक्रेनच्या महापौरांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युक्रेन आणि रशिया यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होण्याची भीती निर्माण झाली आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि सैनिक सज्ज केले आहेत. अशा या युद्धजन्य परिस्थितीत जर्मनीने युक्रेनसाठी 5 हजार हेल्मेट पाठवली आहेत. हे पाहून युक्रेनचे महापौर विताली क्लित्शको यांनी डोक्याला हात लावला आहे. ‘आता जर्मनी आम्हाला काय पाठवणार आहे उश्या? असा खोचक प्रश्न विताली यांनी विचारला आहे.

रशियाने युक्रेन आपल्या ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या असल्याचं बोललं जात आहे. जर्मनीला माहिती तरी आहे का इथे काय चाललं आहे ? असा प्रश्न विताली यांनी विचारलाय. आम्ही बलाढ्य रशियासमोर उभे ठाकलो असून त्यांच्याकडे अतिप्रगत शस्त्रास्त्रे आहेत. रशिया कोणत्याही क्षणी आमच्यावर हल्ला करू शकतो असं विताली यांनी सांगितलंय. अशा आक्रमणाचा मुकाबला फक्त 5 हजार हेल्मेट घालून करायचा का असा संतप्त सवाल युक्रेनवासी जर्मनीला करत आहेत.

इंग्लंडने नाटोतील सदस्य देशांना आवाहन केलं आहे की रशियाच्या दादागिरीला मोडून काढण्यासाठी युक्रेनमध्ये शस्त्रास्त्रांचा पूर आणला पाहिजे. हेल्मेट, उश्या पाठवून आणि रशियावर निर्बंध घालून काहीही होणार नसल्याचं इंग्लंडच्या नेत्यांचं म्हणणं आहे. नाटोचे सदस्य देश असलेल्या डेन्मार्क, स्पेन, बल्गेरिया आणि नेदरलँड यांनी त्यांची लढाऊ विमाने आणि युद्धनौका पश्चिम युरोपाच्या दिशेने रवाना केली आहेत. अमेरिकेने 8500 सैनिकांना अलर्ट ठेवले असून सूचना मिळताच त्यांची तैनाती केली जाणार आहे. जर्मनीने मात्र अध्याप त्यांचे सैनिक युक्रेनच्या मदतीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलेला नाहीये. जर्मनी नैसर्गिक गॅससाठी रशियावर अवलंबून असल्याने आणि त्यांचा युद्धइतिहास डागाळलेला असल्याने, जर्मनीची सैन्य युक्रेनच्या मदतीसाठी पाठवण्यासाठी टाळटाळ सुरु असल्याचं सांगितलं जातंय