मुंबई खिलाडीजचा पराभवाने शेवट

अल्टीमेट खो-खोच्या साखळी सामन्यांच्या शेवटच्या दिवशीही मुंबई खिलाडीजला दारुण पराभवालाच सामोरे जावे लागले. ओडिशा जगरनॉट्सने सहाव्या विजयाची नोंद करताना खिलाडीजचा 34-24 असा सहज पराभव केला. तर चेन्नई क्विक गन्सने गुजरात जायंट्सचा धुव्वा उडवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. आता उपांत्य फेरीत चेन्नईची गाठ तेलुगू टायटन्सशी पडेल तर ओडिशा जगरनॉट्सला गुजरात जायंट्सशी भिडावे लागेल. गुरुवारी दोन्ही उपांत्य लढती होणार असून शनिवारी अंतिम सामना रंगेल.

स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या चारही संघांना नमविण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई खिलाडीजला आज आपला शेवट विजयी करण्याची संधी होती, पण ओडिशा जगरनॉट्सच्या वेगवान खेळाने त्यांना ती संधी दिली नाही. ओडिशाचा खेळच इतका भन्नाट होता की, पहिल्या डावातच त्यांनी 12-2 अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने पावले टाकली, मात्र दुसऱया डावात खिलाडीच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत ओडिशाला भंडावून सोडले. त्यांच्या आक्रमकांनी 12 गुणांची कमाई करत ओडिशाची बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. तरीही दुसरा डाव मुंबईचाच होता. ओडिशाला केवळ 3 गुण मिळविता आले. त्यामुळे त्यांच्याकडे 15-14 अशी निसटती आघाडी होती.

तिसऱया डावात ओडिशाने 14 गुणांची कमाई करत 29-14 अशी आघाडी घेत मुंबईसमोर 16 गुणांचे अवघड आव्हान ठेवले. मुंबईच्या आक्रमकांना केवळ दहा गुण मिळवता आले, मात्र ओडिशाच्या संरक्षकांनीही 5 गुणांची कमाई करत सामना 34-24 असा जिंकला.