
उल्हासनगर मोठ्या संख्यने उमेदवार निवडणूक लढवत असल्याने खर्चाचा अहवाल तयार करण्याचे जिकिरीचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागते. खर्च सादर करण्याबाबत उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या पाश्र्वभूमीवर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची मिटिंग घेऊन रोजचे खर्चाचे बजेट कसे बनवायचे याचा कानमंत्र खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे यांनी दिला.
उल्हासनगर महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून ७८ जागांसाठी ४३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांना रोजचा प्रचाराचा खर्च निवडणूक विभागाला सादर करावा लागतो. त्यामुळे खर्च मर्यादा किती? दररोज करण्यात येणारा खर्च कसा सादर करायचा? याबाबत उमेदवार व प्रतिनिधींना पालिका निवडणूक विभागाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी किरण भिलारे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या खर्चविषयक तरतुदींबाबत सर्वांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य लेखा परीक्षक अभिजीत पिसाळ, उपमुख्य लेखा परीक्षक विलास नागदिवे, संजय वायदंडे उपस्थित होते.




























































