
रस्त्याच्या विकासकामांचे श्रेय लाटण्यावरून उल्हासनगरात मिंधे गटात आज तुफान रक्तरंजित राडा झाला. दोन गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाठय़ाकाठय़ांनी अक्षरशः धू धू धुतले आणि डोकी फोडली. भररस्त्यात झालेल्या या राडय़ाने दोन कार्यकर्ते रस्त्यातच बेशुद्ध पडले तर दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एसएसटी कॉलेज परिसरात ही घटना घडली. मिंधे गटाच्या दोन्ही बाजूंकडील कार्यकर्त्यांनी परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मिंधे गटातील राडेबाजीची खमंग चर्चा सुरू आहे.
मानेरा विभागातील एसएसटी कॉलेज परिसरात रस्त्याचे काम झाले आहे. या रस्त्याची पाहणी करण्यासाठी मिंधे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे येणार होते. त्याआधी मिंधे गटाचे पदाधिकारी अरुण आशान, विजय जोशी काही कार्यकर्त्यांसह या रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेले. त्याचवेळी या परिसरातील मिंधे गटातील माजी नगरसेविका विमल वसंत भोईर यांच्या मुलांनी काही साथीदारांसह त्यांची वाट अडवली आणि हा रस्ता आमच्या प्रयत्नाने झाला. इथे तुम्ही येता ते आम्हाला माहीतच नाही, असे सांगत त्यांना थेट बांबूने झोडपायला सुरुवात केली. या धुमश्चक्रीत दोन कार्यकर्त्यांची डोकी फुटली तर दोघेजण बेशुद्ध झाले. विजय जोशी यांनाही जोरदार चोप मिळाला.
या घटनेनंतर परिसरात पळापळ सुरू झाली. त्यात एका बघ्याने या हल्ल्याचे शूटिंग केले आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे मिंधे गटातील भानगडी जगजाहीर झाल्या आहेत. दरम्यान विजय जोशी यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली. आमच्याच लोकांनी आमची डोकी फोडली, असा संताप त्यांनी व्यक्त केला. जखमींना उपचारासाठी शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

























































