
उल्हासनगर शहरातील महादेव मंदिरातील पिंडीवरील धातूचा नाग चोरत असताना तो नाग खाली पडला आणि आवाज झाला. आवाज ऐकताच कुत्र्यांनी जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. क्षणाचाही विलंब न करता चोरट्याने जीवाच्या आकांताने पळ काढला. त्यामुळे चोरट्याचा चोरीचा डाव फसला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
कॅम्प क्रमांक 3 ओटी सेक्शनमध्ये महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर असलेला धातूचा नाग चोरट्याने चोरण्याचा प्रयत्न केला. पिंडीवरील नाग काढून त्याने मंदिराच्या ओट्यावर ठेवला. उडी मारून कंपाऊंडच्या बाहेर जात असताना हा नाग घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र तितक्यात नाग खुर्चीत पडला आणि आवाज झाला. या आवाजाने कुत्रे भुंकू लागल्याने नाग तेथेच ठेवून चोरट्याने पळ काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक मंदिरात आले असता त्यांना नाग बाहेर दिसला. त्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही तपासले असता ही घटना उघडकीस आली.