
अवैध देशी कट्टा विक्रीचे पुसद कनेक्शन सापडले असून उमरखेड येथे स्थानिक गुन्हे शाखेने दोन जिवंत काडतूससह एक देशी कट्टा जप्त केला आहे. तसेच एका आरोपीला यासंदर्भात अटक केली आहे, काहीच दिवसांपूर्वी पोलिसांनी महागाव येथून देशी कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त केली होती. या दोन्हीही घटनांमध्ये पुसद कनेक्शन उघडकीस आले असून यामध्ये कट्टा विकणारा एकच आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दल कसोशीने प्रयत्न करीत आहे. उमरखेड शहरातील महागाव रोडवरील संजेरी धाब्याजवळ एक इसम गावठी पिस्टलसह येणार असल्याची असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. घटनास्थळ गाठून सदर आरोपीची अंगझडती घेतली असता आरोपीकडून गावठी बनावटीचा देशी कट्टा व बुलेट राऊंडचे दोन जिवंत काडतुस आढळले आरोपी ताईफखान जहांगिरखान पठाण यास दोन जिवंत काडतूस अग्निशस्त्रासह (देशी कट्टा) अटक करण्यात आली. आरोपी ताईफखान जहांगिरखान पठाण याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. काहीच दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने महागाव येथे अजून एका आरोपीकडून असाच देशी कट्टा जब्त केला होता. या दोन्ही घटनांमधे पुसद कनेक्शन समोर आले असून यातील प्रमुख सूत्रधार अमजद खान सरदार खान असल्याचे समोर आले आहे. सध्या अमजद खान हा कारागृहात आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी एकाच नामवंत डॉक्टर च्या खुनात त्याला अटक केली आहे. अटकेपूर्वी अमजद खान हा जवळपास दोन वर्षे फरार होता. याच दरम्यान त्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी गावठी बनावटीचा देशी कट्टे विकले असल्याचे समजते. हे गावठी कट्टे त्याने पर राज्यातून आणली असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय गजानन गजभारे, पीएसआय अमोल राठोड व चालक पीएसआय रेवण जागृत तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, मोहम्मद ताज सुनील पंडागळे यांच्या पथकाने ही कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली आहे.
मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकर यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच यवतमाळ सारख्या भागात पर राज्यातून आणलेले देशी कट्टे कुठे कुठे आणि किती विकल्या गेले याचा पोलीस दलाला शोध घेणे अत्यंत जरुरी आहे. हे कट्टे गुन्हेगारांकडून अवैध कामांसाठी वापरल्या जात असतील तर हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या प्रश्नाकडे पोलीस दलाने गंभीरतेने बघणे आवश्यक आहे.



























































