
उमेश मोहित
मराठी साहित्यविश्वात अतिवृष्टी आणि महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मानवी जीवसृष्टीच्या झालेल्या धुळधाणीचे चित्रण कथा, कादंबरीच्या माध्यमातून कमी-अधिक प्रमाणात झालेले असून सन 2019 मध्ये कृष्णा-पंचगंगेला आलेल्या प्रलयकारी महापुरामुळे सांगली, कोल्हापूर परिसरात झालेल्या जीवित आणि वित्तहानीचे जिवंत चित्रण करणारी विजय जाधव लिखित ‘पाऊसकाळ’ ही कादंबरी त्या काळाचा प्रत्यय देते.
कृष्णेला आलेल्या महापुराने निर्माण झालेले निसर्गाचे रौद्र रूप आणि त्या अस्मानी संकटात उद्ध्वस्त झालेले शेतकरी-कष्टकरी जीवन नि त्यांची उडालेली दैना, शेतीसहित जित्राबाची झालेली हानी इत्यादींचे अगदी अंतःकरण विदीर्ण करणारे चित्रण या कादंबरीत आहे. यादववाडी नावाच्या एका छोटय़ाशा खेडय़ातील व्ही. डी. यादव हा बेकार तरुण बी.एड. झाल्यानंतर चार वर्षांनी कृष्णेकाठच्या माणगावच्या विनाअनुदानित शाळेवर अध्यक्ष रावसाहेबांच्या शिफारसीने शिक्षक म्हणून दाखल होतो, इथून ही कहाणी सुरू होते.
लेखक विजय जाधव लिखित ‘पाऊसकाळ’ ही कादंबरी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईने घडवून आणलेल्या विनाशकारी प्रलयाचे वास्तव चित्रण अगदी तपशीलवारपणे करणारी असून माणगाव नावाच्या कृष्णेकाठच्या एका सधन नि संपन्न खेडय़ावर महापुराने ओढवलेल्या पूरस्थितीचा धांडोळा समग्रपणे घेते. वेगवान कथानक असलेली ही कादंबरी अगदी ओघवत्या शैलीत कृष्णेच्या पुरामुळे उडालेल्या गावकऱ्यांच्या नि जित्राबांच्या हालअपेष्टांचे आणि ससेहोलपटीचे शब्दचित्र उभे करते.
कृष्णेच्या या प्रलयकारी महापुराच्या काळात गाव-मातीशी नि माणसांशी घट्ट नाळ जुळलेला हाडाचा शिक्षक म्हणून वास्तवात लेखक जाधव यांनी कार्य केले असावे, असे वाटण्याइतपत जिवंतपणा नि वास्तविकता या कादंबरीत आहे. माफक निवेदन असलेली कादंबरीची भाषा सांगली-कोल्हापूर परिसरातली रांगडी बोली असल्यामुळे लेखनाची नजाकत वाढली आहे, हे नक्की! तसेच गटा-तटाचे राजकारण आणि स्वार्थी पुढारी, गावकऱ्यांतील आपापसातील हेवेदावे, ग्रामीण इरसाल माणुसकी हरवलेली माणसे, ग्रामीण भागातल्या शिक्षणसंस्थांमधील ओंगळ कारभार,जातीय अहंकाराचे प्राबल्य इत्यादी बाबींची ठळक प्रचिती ही कादंबरी देते.
एकुणात शेतकऱ्यांसहित सर्वांनाच हवा-हवासा वाटणारा पाऊससुद्धा एकदा ‘काळ’ होऊन मागे लागला की, साऱ्या परिसरासह घरेदारे, शेत-शिवारांसहित जित्राबांचीही कशी धूळधाण करतो, याचा अनोखा आणि अंगावर रोमांच उभा करणारा प्रत्यय ही ‘पाऊसकाळ’ देते. या कादंबरीत प्रखरपणे उजागर झालेले अनुभवविश्व वाचकांच्या मनात नक्कीच दीर्घकाळ रेंगाळत राहील, हे नक्की!
पाऊसकाळ
लेखक ः विजय जाधव
प्रकाशक ः मौज प्रकाशन, मुंबई
पृष्ठs ः 172, मूल्य ः रुपये 275/-























































