युद्धजन्य भागात पोटाची भूक शमवली, शांततेचे नोबेल वर्ल्ड फूड प्रोग्रामला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक अन्न कार्यक्रमाला (वर्ल्ड फूड प्रोग्राम) या संस्थेला जाहीर झाला आहे. नॉर्वेच्या नोबेल समितीचे अध्यक्ष बेरिट राईस अॅण्ड सन यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. नोबेल शांतता पुरस्कारासाठी जगभरातून 318 जण स्पर्धेत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा यांचीही नावे होती.

युद्धजन्य भागातील भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि तेथील परिस्थितीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी वर्ल्ड फूड प्रोग्रामने मोलाची कामगिरी बजावली असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे.
अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेनंतर 1963 साली वर्ल्ड फूड प्रोग्रॅमची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी जगभरातील विविध देशांमधून निधी दिला जातो. वर्ल्ड फूड प्रोग्रॅमने 2019 मध्ये सुमारे 88 देशांतील 10 कोटी नागरिकांपर्यंत खाद्यान्न पाठवले. भुकेच्या प्रश्नांवर काम करणारी आणि अन्न सुरक्षेला प्रोत्साहन देणारी ही जगातील सर्वात मोठी मानवतावादी संस्था आहे.

काय म्हटले नोबेल समितीने
वर्ल्ड फूड प्रोग्रॅम या संस्थेने विविध स्तरांवरील शांततेसाठी अन्न सुरक्षा हे एक माध्यम वापरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. युद्धजन्य भागांतील भूकेच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. या संस्थेने अल्फ्रेड नोबेल यांना अभिप्रेत राष्ट्रांमधील बंधुत्वाची भावना वाढीस लागावी म्हणून मोठे योगदान दिले. ही संस्था नोबेल पुरस्काराला अभिप्रेत अशी आधुनिक शांततेचे प्रतिक आहे, असे नोबेल समितीने म्हटले आहे.

कोरोना काळात अन्नपुरवठा
कोरोना महामारीमुळे जगभरात भुकेच्या संकटाशी तोंड देणाऱयांची संख्या वाढली आहे. अशा गरजवंतांपर्यंत अन्न पोचवण्यात वर्ल्ड फूड प्रोग्रामने महत्त्वाची भूमिका बाजवली. या काळात वर्ल्ड फूड प्रोग्रामने भूकेचा प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रयत्न वाढवले, असे गौरवोद्गार नोबेल पुरस्कार समितीने काढले.