
ऑनलाइन शिक्षणाचा प्लॅटफॉर्म असणाऱ्या unacademy वरील एका शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ‘विसरू नका, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मतदान कराल तेव्हा सुशिक्षित व्यक्तीला मत द्या, जेणेकरून तुम्हाला पुन्हा या (अग्निपरिक्षेला) सामोरं जावं लागणार नाही. शिक्षित आणि समजून घेणार्या व्यक्तीला निवडून द्या. ज्याला फक्त नावे बदलणे माहीत आहे अशा व्यक्तीला निवडून देऊ नका. योग्य रीतीनं निर्णय घ्या’, असं आवाहन अनअकॅडमीचे शिक्षक करण सांगवान यांनी आपल्या विद्यार्थ्यांना केलं होतं. तसंच नुकतीच जी विधेयकं मंजूर झालं आहेत त्यावर त्यांना अभ्यासपूर्ण चर्चा करण्यासा सांगितलं होतं.
त्याच्या या आवाहनांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे एक वाद निर्माण झाला ज्यानंतर ई-लर्निंग प्लॅटफॉर्मनं कराराचा भंग केल्याचा आरोप करत सांगवानला कामावरून काढून टाकलं.
सांगवान हे ब्रिटीशकालीन गुन्हेगारी कायद्यांच्या जागी केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेल्या ताज्या विधेयकावर चर्चा करत होते. फौजदारी कायद्यावर त्यांनी तयार केलेल्या सर्व नोटा नाव बदलल्याने निरुपयोगी ठरल्या, असे त्यांनी सांगितले.
‘मला हसावे की रडावे हेच कळत नाही कारण माझ्याकडे खूप नोट्स आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढच्या वेळी मतदान करताना सुशिक्षित उमेदवार निवडा जेणेकरुन तुम्हाला आयुष्यात पुन्हा हे सर्व सहन करावे लागणार नाही… ज्याला फक्त नाव कसे बदलायचे हे माहित आहे अशाला मत देऊ नका’, असं ते पुढे म्हणाले.
या त्यांच्या विधानांमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. सांगवान यांनी कोणाचेही नाव घेतलं नसले तरी अनेकांनी ते भाजप सरकारवर निशाणा साधत असल्याचा दावा केला. काही सोशल मीडिया युझर्सनी अनअकॅडमीवर ‘मोदीविरोधी अजेंडा’ पसरवल्याचा आरोप केला. दरम्यान, इतर अनेकांनी त्या विधांनाचा सांगवानला पाठिंबा दिला.
या वादानंतर ई-लर्निंग प्लॅटफॉर्मने सांगवान यांची हकालपट्टी केली. कंपनीनं म्हटलं आहे की, शिक्षकाचं विधान ‘त्याच्या आचारसंहितेचं उल्लंघन’ आणि ‘कराराचा भंग’ आहे. अनअकॅडमीचे सह-संस्थापक रोमन सैनी म्हणाले की कंपनीचे नियम शिक्षकांना वर्गात वैयक्तिक मतं आणि दृश्यं शेअर करण्यास मनाई करतात.
‘आमच्या विद्यार्थ्यांना निःपक्षपाती ज्ञान मिळावं हे निश्चित करण्याच्या उद्देशानं आम्ही आमच्या सर्व शिक्षकांसाठी कठोर आचारसंहिता लागू केली आहे. आम्ही जे काही करतो त्यामध्ये आमचे विद्यार्थी केंद्रस्थानी असतात. वैयक्तिक मते आणि विचार शेअर करण्यासाठी वर्ग ही जागा नाही. कारण ते चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर प्रभाव टाकू शकतात. सध्याच्या परिस्थितीत, आचारसंहितेचा भंग केल्यामुळे आम्हाला करण सांगवान यांना हटवण्याचा निर्णय भाग पडले गेले’, असं सैनी म्हणाले.
सांगवान यांनी या वादाला उत्तर दिलं आणि सांगितले की न्यायिक सेवा परीक्षांची तयारी करत असलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांना ‘परिणाम’ भोगावे लागत आहेत.
‘गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे मी वादात सापडलो आहे आणि त्या वादामुळे न्यायिक सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या अनेक विद्यार्थ्यांना अनेक परिणाम भोगावे लागत आहेत. त्यांच्यासोबत मलाही त्याचे परिणाम भोगावे लागतील’, असं सांगवान म्हणाले.
शिक्षकांना काढून टाकण्याच्या अनअकॅडमीच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. विरोधी पक्षांच्या नेत्यांसह अनेक लोकांनी या निर्णयाचा निषेध केला आणि अशा कृतीला ‘अयोग्य’ म्हटले आणि भाषण स्वातंत्र्य दडपल्याचा आरोप केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना विचारले की, सुशिक्षितांना मतदान करण्याचा आग्रह करणे गुन्हा आहे का? काँग्रेसचे राज्यसभा खासदार दीपेंद्र सिंग हुड्डा यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटलं आहे आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी विचारले की, ‘साक्षर राजकारण्यांना मत देणे हे पक्षपाती मत असे आपण कसे म्हणू शकतो?’





























































