
चुलत्याच्या घरी गेलेल्या पुतणीचा चुलत्याने विनयभंग केला. चुलत्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पुतणीने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी घेत आत्महत्या केली. एप्रिल 2018 ते 6 सप्टेंबर 2020 या कालावधीत त्याने विनयभंग केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गौरव सोपान नारखेडे (वय 30, रा. कलावती लॉन्ससमोर, संभाजीनगर ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्या मुलीसह भोसरी येथे एकट्या राहतात. त्यांची मुलगी सुटीसाठी संभाजीनगर येथे आपल्या चुलत्याकडे गेली होती. त्या वेळी चुलत्याने पुतणीच्या विनयभंग केला. वारंवार होणाऱ्या या प्रकाराला कंटाळून तिने 6 सप्टेंबर रोजी राहत्या घराच्या गॅलरीमधून उडी घेत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार दाखल झाल्याने भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
























































