
वेस्ट इंडीजमध्ये खेळवल्या जाणाऱया युवा (19 वर्षांखालील) विश्वचषक जिंकण्यासाठी हिंदुस्थानी युवा संघ आता फक्त दोन पावले दूर आहे. आतापर्यंत विश्वचषकातील तिन्ही सामन्यांमध्ये जिंकत हिंदुस्थानच्या या युवा शेरांनी स्पर्धेतील आपली दिग्विजयी दौड कायम राखली आहे. आता उद्या ऑस्ट्रेलियन संघाशी दोन हात करण्यासाठी युवा टीम इंडिया सज्ज झाली आहे.
हिंदुस्थानने उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या बांगलादेशवर शानदार विजय मिळवत मागच्या विश्वचषकातील पराभवाचा हिशेब चुकता केला. यापूर्वी 2020 साली झालेल्या विश्वचषकात बांगलादेशने हिंदुस्थानवर विजय मिळवत युवा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. पण यंदा हिंदुस्थानी युवा संघाने बांगलादेशला पराभूत करीत अंडर 19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता उपांत्य फेरीत हिंदुस्थानची गाठ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्यामुळे युवा टीम इंडिया सध्याच्या घडीला विश्वविजयापासून दोन पावले दूर आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत हिंदुस्थानी युवा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
कोरोनाही हिंदुस्थानी शेरांचे मनोधैर्य खालावू शकला नाही
जगभरात धुमाकूळ घालणाऱया कोरोना महामारीने युवा टीम इंडियातील 6 प्रमुख खेळाडूंना गाठले होते. त्याही स्थितीत केवळ 11 खेळाडू घेऊन उर्वरित संघाने आपली स्पर्धेतील विजयी दौड खंडित होऊ दिली नाही. अखेर कर्णधार यश धूळसह हिंदुस्थानचे 6 प्रमुख खेळाडू फिट होऊन बांगलादेशविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत उतरले आणि त्यांनी संघाची विजयपताका फडकावतच ठेवली. कोरोनाचा हल्लाही हिंदुस्थानी शेरांचे मनोधैर्य खच्ची करू शकला नाही. त्यामुळे उद्याच्या उपांत्य लढतीतही टीम इंडिया विजयाच्या जबर निर्धाराने उतरणार हे स्पष्ट झाले आहे.

























































