Under 19 world cup – हिंदुस्थानची विजयी हॅट्ट्रिक!

जबरदस्त फॉर्मात असलेल्या हिंदुस्थाननै न्यूझीलंडचा सात गडी राखून धुव्वा उडवीत १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. चार बळी टिपणारा आर.एस. अंबरीश ‘सामनावीर’ ठरला.

झिम्बाब्वेतील बुलावायो येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत शनिवारी पावसाच्या व्यत्ययात झालेल्या सामन्यात हिंदुस्थानी संघाने न्यूझीलंडचा ‘डकवर्थ-लुईस’ नियमानुसार सात गडी आणि १४१ चेंडू राखून पराभव केला. ‘टीम इंडिया’ने ३७ षटकांत मिळालेले १३० धावांचे सुधारित लक्ष्य अवघ्या १३.३ षटकांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केले. कर्णधार आयुष म्हात्रेने २७ चेंडूंत ५३ धावांची आक्रमक खेळी केली. त्याला वैभव सूर्यवंशीने उत्तम साथ देत २३ चेंडूंत ४० धावा केल्या.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडचा संघ ३६.२ षटकांत १३५ धावांत सर्व बाद झाला. हिंदुस्थानकडून आर. एस. अंबरीशने चार बळी घेतले, तर हेनिल पटेलने तीन विकेट्स पटकाविल्या. न्यूझीलंडकडून कॅलम सॅमसनने नाबाद ३७, तर सेल्विन संजयने २८ धावांची खेळी केली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी ५३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.