
हिंदुस्थानच्या पोरी क्रिकेटमध्ये जगात भारी ठरल्या आहेत. त्यांनी 19 वर्षांखालील मुलींच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील किताबी लढतीत बलाढय़ इंग्लंडची दाणादाण उडवून पहिल्या जगज्जेतेपदावर नाव कोरून इतिहास घडविला. आधी इंग्लंडचा 68 धावांत खुर्दा उडविल्यानंतर हिंदुस्थानने 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 14 षटकांतच विजयाची औपचारिकता पूर्ण करून जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. हिंदुस्थानची 6 धावांत 2 विकेट टिपणारी तिटास साधू ही अंतिम लढतीत विजयाची शिल्पकार ठरली, तर इंग्लंडची ग्रेस क्रिवेन्स स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरली. दरम्यान, बीसीसीआयने संघाला 5 कोटींचे बक्षीस जाहीर केले.
इंग्लंडकडून मिळालेले 69 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानच्या मुलींनी 14 षटकांत केवळ 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार शेफाली वर्मा (15) व श्वेता सेहरावत (5) ही सलामीची जोडी 20 धावांतच तंबूत परतली होती. शेफालीने 11 चेंडूंत एक षटकार व एक चैकार लगावला. मात्र हन्ना बेकरच्या गोलंदाजीवर स्टोनहाऊसकरवी झेलबाद झाल्याने तिला मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर सौम्या तिवारी (नाबाद 24) व गोंगाडी त्रिशा (24) यांनी संयमाने फलंदाजी केली. विजयासाठी 3 धावांची गरज असताना त्रिशा बाद झाली. सौम्याने विजयी फटका मारून सामना संपविला. s
मुलांनंतर मुलींची बाजी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रथमच 19 वर्षांखालील मुलींच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. दक्षिण आफ्रिकेला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले. क्रिकेट खेळाची जननी असलेल्या इंग्लंडला पराभूत करून हिंदुस्थानी मुलींनी बाजी मारत जगज्जेतेपदाचा झळाळता करंडक उंचावला. 19 वर्षांखालील मुलांचा टी-20 विश्वचषकही हिंदुस्थाननेच जिंकलाय. गतवर्षी झालेल्या या स्पर्धेत हिंदुस्थानच्या मुलांनी किताबी लढतीत इंग्लंडचाच पराभव केला होता.



























































