‘युनिसेफ’चा मुलांसाठी मेनू उत्तपा आणि डाळ पराठा

489

कोणताही पदार्थ केला तरी मुले तो खातच नाहीत… ही ओरड प्रत्येक आईची नेहमीचीच! त्यामुळे मुले कमजोर आणि अशक्त होऊ लागतात. मात्र या मुलांनी धष्टपुष्ट होण्यासाठी ‘युनिसेफ’ने खास मुलांसाठी मेन्यू सादर केला आहे. संस्थेने ‘उत्तप्पापासून डाळ पराठय़ापर्यंत’ नावाचे पुस्तकच आणले आहे. या पुस्तकात 20 रुपयांहूनही कमी रुपयांमध्ये तयार करण्यात आलेले पौष्टिक भोजन मातांना बनवता येणार असून त्यामुळे मुले कमी वजन, लठ्ठपणा किंवा अॅनिमियासारख्या समस्यांपासून दूर राहू शकतात.

हे पुस्तक ‘समग्र राष्ट्रीय पोषण सर्वेक्षण 2016-18’या पुस्तकात देण्यात आलेल्या मुलांच्या सद्यस्थितीबाबतच्या आकडेवारीचा आधार घेत बनवण्यात आले आहे. मुलांमधील ही कमजोरी घालवण्यासाठी ‘युनिसेफ’ने बनवलेल्या या पुस्तकात मुलांनी आलू पराठा, पनीर काठी रोल, साबुदाणा कटलेट असे त्यांच्या आवडीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत असे म्हटले आहे. लठ्ठपणा घालवण्यासाठी मुलांनी अंकुरीत डाळीचे पराठे, पोहे आणि भाज्या घातलेला उपमा खावा असे सुचविले आहे. या पुस्तकात कोणत्या पदार्थात किती कॅलरीज असतात हे सांगितले आहेच. शिवाय प्रोटिन, कर्बोदके, फॅट, फायबर, लोह, व्हिटॅमीन-सी आणि कॅल्शियम यांचे प्रमाण एखाद्या पदार्थात किती असावे, ते किती असले म्हणजे फायद्याचे ठरेल याची पूर्ण माहिती देण्यात आली आहे.

मधुमेहाला ठेवा दूर…
शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणा ही समस्या अलीकडे वाढत चालली आहे. त्यामुळे या मुलांमध्ये 10 टक्के मधुमेहासारखा रोग वाढू लागतो. ठरावीक डाएट केल्याने या मधुमेहालाही दूर ठेवता येते असे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. 28 पानांच्या या पुस्तकात ताजे अन्नपदार्थ आणि प्रत्येक पदार्थ बनविण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे हेही सांगितले आहे. या पुस्तकाद्वारे लोकांना पौष्टिक आहाराचे महत्त्व समजावून देण्याचा आमचा उद्देश आहे, असे मत ‘युनिसेफ’चे प्रमुख हेनरिटा एच. फोर यांनी व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या