हिंदुस्थानला मदत करा अन्यथा जग संकटात, युनिसेफचा जगाला इशारा

हिंदुस्थानातील वाढता कोरोनाचा कहर पाहून युनिसेफने संपूर्ण जगाला ‘हायअलर्ट’ केला आहे. हिंदुस्थानची कोरोनास्थिती ही सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा असून कोरोनाच्या विषाणूमुळे रोज बाधित होणाऱया नागरिकांची आणि मृत्यू होणाऱयांची संख्या पाहता आता जगातील देशांनी पुढाकार घेऊन हिंदुस्थानला मदत केली नाही तर याचे जगावरही मोठे परिणाम होतील, असा इशारा युनिसेफच्या प्रमुखांनी दिला आहे.

‘हिंदुस्थानातील दुःखद परिस्थिती ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे’ असे युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा पह्र यांनी गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेत हिंदुस्थानात दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण नेंदविले जात असून तीन हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. हिंदुस्थानात सध्या 2.06 कोटी कोरोना रुग्ण असून दोन लाख 26 हजार मृत्यू झाले आहेत. एकटय़ा हिंदुस्थानात 90 टक्के बाधा आणि मृत्यू होत आहेत.

जगातील 46 टक्के कोरोना रुग्ण हिंदुस्थानात असून एकूण कोरोना मृत्यूपैकी 25 टक्के मृत्यू हिंदुस्थानात होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ही आपत्ती थांबविण्यासाठी खंबीर नेतृत्व गरजेचे असल्याचे युनिसेफचे दक्षिण आशियाचे प्रादेशिक संचालक जॉर्ज लॅरीए अड्जेयी यांनी निवेदनात म्हटले आहे. युनिसेफच्या युनायटेड नेशन्स चाइल्ड फंडाने हिंदुस्थानला 20 लाख फेसशील्ड आणि दोन लाख सर्जिकलसह अतिरिक्त अत्यावश्यक जीवनरक्षक औषधांचा पुरवठा केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या